पाण्याची टाकी व विविध विकासकामांचे उद्घाटन
लोकमत न्यूज नेटवर्क
कसबा बावडा : बावड्याच्या टाकीचा प्रश्न चर्चेत होता. या टाकीची काळजी शिरोलीकरांना होती; पण त्यांना आपण वेळोवेळी पाणी पाजले आणि यापुढेही पाजू, असा टोला पालकमंत्री सतेज पाटील यांनी माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे नाव न घेता लगावला. लवकरच पुढे राजाराम कारखान्याची निवडणूक आहे हे सांगायलाही पालकमंत्री विसरले नाहीत.
स्वस्तिक चौकातील नवीन बांधण्यात आलेल्या २० लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचे उद्घाटन, बावडा-कदमवाडी रस्ता व चॅनेल कामाचा प्रारंभ व डी. वाय. पी. ग्रुपकडून विकसित केलेल्या नागरी सुविधा केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते झाले. या संयुक्त कार्यक्रमानंतर कसबा बावडा भाजी मंडई येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी आमदार प्रा. जयंत आसगावकर यांचा दत्ता उलपे यांच्या हस्ते व बावड्यातील नागरिक सुविधा केंद्र डी. वाय. पाटील ग्रुपकडून विकसित केल्याबद्दल डी. वाय. पी ग्रुपचे अध्यक्ष संजय डी. पाटील यांचा सत्कार माजी महापौर निलोफर आजरेकर यांच्या हस्ते झाला. यावेळी खासदार संजय मंडलिक, आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री म्हणाले, थेट पाईपलाईनचे काम ५३ कि.मी. पैकी ४९ कि.मी. पूर्ण झाले आहे. त्यामुळे येत्या मे महिन्यापूर्वी कोल्हापूर शहराला थेट पाईपलाईनचे पाणी दिले जाईल. सध्या कोल्हापूर महापालिकेची निवडणूक तोंडावर आली आहे. या निवडणुकीसाठी खासदार संजय मंडलिक, मी आणि मुश्रीफसाहेब एकत्र बसून काही जागांसाठी निर्णय घेऊया. बावड्यातील एक ते सहा प्रभागांत आतापर्यंत ३७ कोटी रुपयांची विकासकामे केली आहेत. येत्या मार्चपर्यंत आणखी सहा ते सात कोटी रुपयांची कामे पूर्ण केली जातील. बावड्यातील नागरी सुविधा केंद्र होण्यासाठी संजय डी. पाटील यांनी मनावर घेतले आणि बारा लाख रुपये खर्च करून हे केंद्र आता सुरू झाले आहे.
खासदार संजय मंडलिक म्हणाले, पुढच्या काळात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना अशा सर्वांनी मिळून एकत्र निवडणूक लढवण्याचा विचार करावा.
आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, बावडा माझी कर्मभूमी आहे. बावडा माझा पाया आहे. मी बावड्याला कधीच विसरू शकणार नाही. लवकरच बावडा मॉडर्न करू. आमदार चंद्रकांत जाधव, आमदार प्रा. जयंत आसगावकर यांची भाषणे झाली. उपमहापौर संजय मोहिते, श्रीराम सोसायटीचे चेअरमन धनाजी गोडसे, व्हा. चेअरमन संतोष ठाणेकर, माजी नगरसेवक अशोक जाधव, मोहन सालपे, सुभाष बुचडे, संदीप नेजदार, श्रावण फडतारे, माधुरी लाड, स्वाती यवलुजे उपस्थित होते.
पुढे पेट्रोल संपायला नको...
बावड्यातील १ ते ६ प्रभागांच्या उमेदवारीबाबत बोलताना पालकमंत्री म्हणाले, आता अनेकजण इच्छुक आहेत. बरेचजण सोशल मीडियाद्वारे लोकांच्या संपर्कात येत आहेत. प्रचार करत आहेत; पण ज्याला उमेदवारी मिळेल, त्याच्या पाठीशी आपण सर्वजण राहायचं आहे. त्यामुळे आताच कोणी स्पीड वाढवू नका. पुढे पेट्रोल संपायला नको, असे म्हणताच सभेत एकच हशा पिकला.