संदीब बावचे ।शिरोळ : शिरोळ नगरपालिकेसाठी प्रभाग रचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे येत्या जूनमध्ये पालिकेची निवडणूक अपेक्षित आहे. त्यामुळे आतापासूनच शहरात निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे. भाजप विरुद्ध महाआघाडी असा सामना होण्याची शक्यता असली तरी शिवसेना कोणती भूमिका घेणार यावरही पालिकेचे चित्र अवलंबून आहे. आगामी लोकसभा, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पालिकेची ही निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे.
अनेक वर्षांच्या संघर्षानंतर शिरोळला नगरपालिका मंजूर झाली. जनतेतून नगराध्यक्ष आणि प्रभागातून सदस्य निवडी होणार आहेत. यापूर्वी ग्रामपंचायतीत १७ सदस्य होते. नगरपालिकेनंतर ८ प्रभाग होणार असून, ७ प्रभागांत प्रत्येकी दोन, तर आठव्या प्रभागात ३ सदस्य निवडले जाणार आहेत. नगराध्यक्ष व २ स्वीकृत असे वीस सदस्य पालिकेत असतील. २०११च्या जनगणनेनुसार २७ हजार ६४९ इतकी लोकसंख्या आहे. ५० टक्के महिला सदस्यांना स्थान पालिकेत असेल.
दरम्यान, नुकताच पालिकेच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. ३ एप्रिलला प्रारुप प्रभाग रचना त्यानंतर १३ एप्रिलला पालिकेकडील सदस्य पदांच्या आरक्षणाची सोडत होणार आहे. त्यामुळे येत्या जूनमध्ये नगरपालिकेची निवडणूक अपेक्षित आहे. कारण निवडणूक यंत्रणेसाठी लागणारी यंत्रणा म्हणजेच शिक्षक कर्मचारी यांच्या शाळादेखील जूनमध्ये सुरू होणार आहेत. जूनमध्ये निवडणुका गृहीत धरून राजकीय पक्षांच्या हालचालीदेखील गतिमान झाल्या आहेत.
ग्रामपंचायतीत यादव आघाडीची सत्ता होती, तर मागील निवडणुकीत यादव पॅनेल विरुद्ध राजर्षी शाहू आघाडी असा सामना झाला होता. यादव पॅनेलचे नेते अनिल यादव हे भाजपमध्ये गेले आहेत. त्यामुळे भाजप विरुद्ध महाआघाडी अशी लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बहुजन विकास महाआघाडीतील नेत्यांच्या वेगवेगळ्या भूमिकेमुळे आमदार उल्हास पाटील यांनी एकला चलो रे अशी भूमिका सध्या तरी घेतली आहे. त्यामुळे पालिकेच्या या निवडणुकीत शिवसेना काय करणार हादेखील प्रश्न उपस्थित होत असला तरी भाजपच्या कोंडीसाठी सर्व पक्ष एकत्र येण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.गटा-तटाचे राजकारणशिरोळ तालुक्यात पक्षापेक्षा गटा-तटाच्या राजकारणाला अधिक महत्त्व आहे. शिरोळमध्येही गटा-तटाचे राजकारण असले तरी काही प्रभागांत भाऊबंदकीच्या मतदारांवर निवडणूक होते. प्रथमच पालिकेच्या निमित्ताने थेट नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी निवडणूक होत असल्याने इच्छुकांची संख्या वाढणार आहे.