संदीप आडनाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर: जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा जयघोषात उत्साही वातावरणात रविवारी कोल्हापुरातील विविध पेठांमध्ये संयुक्त शिवजयंती उत्सव समितीकडून शिवजयंती उत्सवास प्रारंभ झाला. संयुक्त जुना बुधवार पेठ सेवाभावी संस्थेने मिरवणुकीने शिवमूर्तीची प्रतिष्ठापना केली तर संयुक्त उत्तरेश्वर पेठेत ९ फुटी अश्वारूढ शिवप्रतिमेची स्थापना करण्यात आली. यावेळी मोठी आतषबाजी करण्यात आली.
कोल्हापुरातील संयुक्त जुना बुधवार पेठ सेवाभावी संस्थेच्या वतीने पारंपरिक शिवजयंती उत्सवास रविवारी प्रारंभ झाला. या सोहळ्यात बुधवार पेठेतील ६ तालीम संस्था आणि ८० मंडळांनी सहभाग घेतला. रविवारी सायंकाळी ६ वाजल्यापासून शिवमूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी परिसरात उत्साहाचे वातावरण होते. अब्दागिरी, छत्री, तुतारी, भगव्या पताका, फेटे, घाेड्यावरून शिवाजी महाराजांच्या वेशभूषेतील मावळ्यांचा सहभाग यामुळे हा परिसर दुमदुमून गेला होता. अब्दागिरी, छत्री, तुतारी, भगव्या पताका, फेटे, नऊवारी साडीत सजलेल्या महिला आणि मुलींसोबत तरुण कार्यकर्ते भगवे फेटे घालून मिरवणुकीत सहभागी झाले होते. मान्यवरांच्या हस्ते शिवमूर्तीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर ऐतिहासिक शिवराज्याभिषेक सोहळ्याचा जिवंत देखावा सादर करण्यात आला.
यावेळी दीपक देसाई, सुशील भांदिगरे, दिगंबर फराकटे, नागेश घोरपडे, संदीप राणे, महावीर पवार उपस्थित होते. उद्या सोमवार, दि. ६ मे रोजी सायंकाळी ७ वाजता अलंकार कला अकादमी फाउंडेशन संचालित रसिकरंजन प्रस्तुत महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा हे गीत आणि नृत्याविष्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.