गडहिंग्लज : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन करून शिवजयंतीची मिरवणुक काढल्याप्रकरणी गडहिंग्लजच्या नगराध्यक्षा प्रा.स्वाती कोरी, उपनगराध्यक्ष महेश कोरी यांच्यासह ११ नगरसेवक मिळून २१ जणांवरगडहिंग्लज पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.तसेच मिरवणुकीतील चित्ररथांच्या १८ ट्रॅक्टरवर देखील कारवाई करण्यात आली आहे.गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये जनता दलाचे तालुकाध्यक्ष बाळेश नाईक, नगरसेवक बसवराज खणगावे, राजेश बोरगावे, नितीन देसाई, उदय पाटील, नरेंद्र भद्रापुर, दीपक कुराडे, नगरसेविका सुनिता पाटील, वीणा कापसे, नाझ खलिफा, श्रद्धा शिंत्रे व शशिकला पाटील, प्रकाश तेलवेकर, बाळासाहेब भैसकर, सागर पाटील, शिवाजी कुराडे, इम्रान मुल्ला, विनोद लाखे, लता पालकर यांचा समावेश आहे.
पोलीसातून मिळालेली माहिती अशी, कोविड १९ रोगाचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हाधिकार्यांनी शिवजयंतीच्या निमित्ताने सार्वजनिक ठिकाणी गर्दी करण्यास व मिरवणुका काढण्यास मनाई केली होती.याबाबत पोलीसांनी तोंडी व लेखी सूचना दिल्या होत्या.तरीदेखील बेकायदेशीररीत्या गर्दी जमवून शिवजयंतीची मिरवणुक काढण्यात आली.दरम्यान,मिरवणुक दसरा चौकात आल्यानंतर चित्ररथांचे ट्रॅक्टर पोलीसांनी ताब्यात घेतले. त्यावेळी मिरवणुकीतील कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करुन वाहतुकीत अडथळा निर्माण केला आणि जमाव पांगविणार्या पोलीसांशी हुज्जत घातली. हेड कॉन्स्टेबल संभाजी पाटील यांच्या फिर्यादीवरून गडहिंग्लज पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीसनाईक रविकांत शिंदे अधिक तपास करत आहेत.