संदीप आडनाईक/कोल्हापूर : तपोवन मैदानात जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी उपस्थित राहणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोल्हापूरचे सहा प्रलंबित प्रश्न विचारण्यासाठी आलेल्या शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना मंगळवारी कळंबा ग्रामपंचायतीजवळ ताब्यात घेण्यात आले. इस्पूर्ली येथील पोलिस ठाण्यात दीड तास डांबल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले.
या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांना प्रश्न मांडण्याची परवानगी शिवसेनेच्या ठाकरे गटाने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे केली होती. यामध्ये नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान, चंदगडला शासनाचे काजू बोर्डाचे विभागीय कार्यालय, शाहू महाराज जन्मस्थळाचे काम, राजाराम तलाव परिसरात आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटरला विरोध आदी प्रश्र्न विचारणा करण्यात आली होती.
साडे चार वाजण्याच्या सुमारास तपोवन येथील कार्यक्रम स्थळाकडे निघालेल्या सुमारे दीडशेहून अधिक कार्यकर्त्यांना ५०० मीटर अंतरावर कळंबा ग्रामपंचायतीजवळ पोलिसांनी अडवले. यावेळी शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली. या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांना इस्पूर्ली येथील पोलीस ठाण्यात ठेवल्यानंतर साडे सहा वाजता सोडण्यात आले.
या आंदोलनात विजय देवणे, रविकिरण इंगवले, सुनील मोदी, विराज पाटील, राजू यादव, विनाेद खोत, अवधुत साळोखे, पोपट दांगट, हर्षल सुर्वे, विशाल देवकुळे, तानाजी आंग्रे, मंजित माने, स्मिता सावंत, प्रीती क्षीरसागर, दीपाली शिंदे, प्रकाश पाटील, गणेश देवणे, विराज ओतारी, गोविंद वाघमारे, दीपक गौड सहभागी झाले.
शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते शिरोली पोलिसांच्या ताब्यात
आंदोलन करण्याच्या तयारीत असणाऱ्या शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. माणिक शिंदे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाजीराव पाटील आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते खबरदारी म्हणून मंगळवारी एमआयडीसी शिरोली पोलिसांनी ताब्यात घेतले.