इचलकरंजी : चंदूर (ता. हातकणंगले) येथील शाहूनगरमध्ये खासदार धैर्यशील माने यांची गाडी संतप्त शिवसैनिकांनी काल, बुधवारी सकाळी अडवली व तुम्ही गद्दारी का केली, असा जाब विचारला. कार्यकर्त्यांनी ‘गद्दार, गद्दार’ अशी जोरदार घोषणाबाजी केली. कार्यकर्ते जास्तच आक्रमक झाल्याने काही वेळ तणावपूर्ण वातावरण बनले.
त्यावेळी माने यांच्यासोबत असलेल्या पोलिसांनी कार्यकर्त्यांना बाजूला करत माने यांच्या गाडीला वाट मोकळी करून दिली. सकाळी साडेअकराच्या सुमारास हा प्रकार घडला. सूरज बबन लाड, चंद्रज लाड, आप्पाजी पाटील, अनिकेत लाटकर, अमीर बिगुलजी, आदर्श तानुगडे आदींसह कार्यकर्ते यामध्ये पुढे होते.ठाकरे गटातून बाहेर पडून शिंदे गटात गेल्यानंतर खासदार माने हे बुधवारी पहिल्यांदाच शाहूनगर येथील एका आधार कार्ड शिबिरासाठी आले होते. ही माहिती ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना समजली. त्यांनी कार्यक्रम संपवून परत निघालेल्या माने यांची गाडी अडवली. आम्ही माने यांच्यासोबत बोलणार आहोत, असे सांगितले. त्यामुळे खासदार माने गाडीतून उतरून बाहेर आले. त्यावेळी कार्यकर्त्यांनी, तुमचे इचलकरंजीतील सरस्वती हायस्कूलमधील भाषण ऐकून आम्ही तुमचे फॅन झालो, आम्ही जिवाचे रान करून तुम्हाला निवडून दिले आणि तुम्ही गद्दारी का केली हे सांगा, असा जाब विचारला.त्यावेळी खासदार माने काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते परंतु कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांना पोलिसांनी मागे रेटले. त्यामुळे गोंधळ उडाला. तेथे शिंदे गटाचे कार्यकर्तेही जमले. दोन्ही गटांचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने तणाव निर्माण झाला. त्यामुळे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी ‘५० खोके, सगळंच ओके’, ‘गद्दार, गद्दार’, ‘उद्धवसाहेब ठाकरे यांचा विजय असो’ असे म्हणत जोरदार घोषणाबाजी सुरू केली. ढकलाढकली होऊन गोंधळ उडाल्याने पोलिसांनी हस्तक्षेप केला. खासदार माने गाडीत बसले. पोलिसांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना बाजूला ढकलत गाडीला वाट मोकळी करून दिली. या प्रकारामुळे परिसरातील वातावरण चांगलेच तणावपूर्ण बनले.
हेरगिरी करायला आला होता काय..?शिवसेनेच्या कोणत्याही कार्यक्रमाला तुम्ही बोलवूनही आला नाही आणि तुमच्या गटाच्या कार्यक्रमाला मात्र आलात तर तुमच्या मनात पहिल्यापासूनच अढी होती काय, तुम्ही शिवसेनेत सहा महिन्यांसाठी हेरगिरी करायला आला होता काय, असे प्रश्न विचारून खासदार माने यांना चांगलेच धारेवर धरले.
त्वेष जास्त...गाडी अडवण्याचे धाडस करणारे मोजकेच कार्यकर्ते होते. परंतु त्यांच्यात त्वेष जास्त होता. थेट गाडीच्या आडवे उभे राहून ते खासदारांना हातवारे करत जाब विचारत होते. ज्या कडवट शिवसैनिकांनी खासदार माने यांच्या विजयासाठी जिवाचे रान केले त्यांचा रोष काय असतो, याचेच प्रत्यंतर त्यांना या घटनेतून आले.
जशास तसे उत्तर देणारठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे इचलकरंजी दौऱ्यावर आले असता शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवत निदर्शने केली. त्यामुळे आम्हीही आता शांत बसणार नाही. यापुढेही जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशाराही ठाकरे गटाच्या कार्यकत्यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
सुरुवात झाली...खासदार माने यांना जाब विचारण्याच्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर दिवसभर जोरदार व्हायरल झाला. त्यावर सुरुवात झाली..आता राज्यभर याचे पडसाद उमटतील अशा प्रतिक्रिया शेअर झाल्या..