कोल्हापूर : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यापासून अनेक वेळा सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला. मात्र मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थिर असल्याने बघता बघता आणखी तीन वर्षांचा कालावधी पूर्ण करेल, असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.आघाडीचे सरकार विश्वासघाताने आल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणत असले तरी, शिवसेनेने भाजपचा विश्वासघात केला की भाजपने शिवसेनेचा, हे महाराष्ट्राची जनताच ठरवेल, असेही मंत्री मुश्रीफ यावेळी म्हणाले.मंत्री मुश्रीफ म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर दोन महिन्यातच कोरोनाची महामारी आली. तरीही ३४ लाख शेतकऱ्यांना २३ हजार कोटींची कर्ज माफी दिली. विकासकामांना कात्री लावत विविध नैसर्गिक आपत्तीमधील नागरिकांना २० हजार कोटींचे पॅकेज दिले. या महामारीमध्ये उध्दव ठाकरे यांनी संयमाने राज्याचा गाडा हाकला, त्यामुळेच देशातील सर्वेक्षणात त्यांना ३० टक्क्यांपेक्षा अधिक पसंती मिळाली. हेच भाजपच्या मंडळींचे दुखणं आहे.त्यामुळे सुशांतसिंह राजपूतपासून महापूर, एस. टी. कर्मचारी संपापर्यंत सरकारला अडचणीत आणण्याचे काम केले. या सगळ्या कुरापतींमध्येही दोन वर्षे आघाडी सरकारने उत्तम काम केले. बघता बघता उर्वरित कालावधीही पूर्ण करेल.
विश्वासघात कोणी कोणाचा केला? हे महाराष्ट्राची जनताच ठरवेल, मंत्री मुश्रीफांचा भाजपला टोला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2021 12:10 PM