कोल्हापूर : देशात तसेच राज्यातील सत्तेत असलेल्या भाजप-शिवसेना या मित्रपक्षांत दिवसेंदिवस ताणले जात असलेले राजकीय संबंध आणि नेत्यांमध्ये निर्माण होत असलेली कटुता याचा परिणाम कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीवर होणार आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपने ऐनवेळी युती तोडून विश्वासघात केल्याची भावना शिवसेना नेत्यांची झाली असल्याने शिवसेना नेते आता आक्रमक झाले आहेत. त्यामुळेच भाजप व शिवसेना ही निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याचीच शक्यता आजच्या घडीला तरी जास्त दिसत आहे. विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने शिवसेनेबरोबरची युती तोडल्याचे सर्वाधिक शल्य शिवसेनेला बोचत आहे. ज्या काळात भाजपचे काहीच अस्तित्व नव्हते त्याकाळात शिवसेनेचा हात धरून महाराष्ट्रात भाजपने वाटचाल सुरू केली. देशात एकहाती सत्ता येताच भाजपने राज्यात शिवसेनेशी दगाबाजी केल्याची खंत शिवसेनेचे नेते बोलून दाखवितात. त्यामुळेच विधानसभेवेळचा अनुभव पाहता ‘भाजपचा नाद करायला नको,’ अशीच भूमिका शिवसैनिकांची आहे. स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याचा आग्रह धरण्यामागे शिवसेनेच्या आमदार राजेश क्षीरसागर यांना विधानसभा निवडणुकीत मिळालेले २२ हजार मताधिक्य हे एक कारण आहे. शिवाय ४३ प्रभागांत त्यांना मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळेच भाजपच्या नेत्यांशी युतीबाबत चर्चा करण्यापेक्षा आणि जागांबाबत तडजोडी करण्यापेक्षा एकहाती राजेश क्षीरसागर यांच्याच नेतृत्वाखाली निवडणूक लढवू या असा शिवसैनिकांचा आग्रह आहे. दोन्ही पक्ष सत्तेत असल्याने युती करण्याबाबत कोणी पुढाकार घ्यायचा यासंदर्भात प्रतिष्ठेचा मुद्दा केली गेल्याचेही सध्या पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला विधानसभा निवडणूकीत भाजपच्या महेश जाधव यांनाही अनपेक्षितपणे चांगली मते मिळाल्याने भाजपही यावेळेला ताकदीने मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे. सध्या शिवसेना भाजपवर उघडपणे हल्ला करत आहे. सोमवारी झालेल्या निर्धार मेळाव्यात खासदार विनायक राऊत आणि डॉ. शिवरत्न शेटे यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना गेंडा व अफझलखानाची उपाधी देऊन भाजपच्या मर्मावर घाव घातला आहे. गेल्याच आठवड्यात आमदार क्षीरसागर यांनीही शहा यांनाच टार्गेट केले होते. युती करण्याबाबतची कोणतीही चर्चा न करता किंवा तसे आवाहन न करता थेट जोरदार हल्ला चढवून शिवसेनेने एकप्रकारे भाजपला थेट आव्हानच दिले आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांवरच झालेली टीका पाहता भाजपही चर्चेला पुढे येईल असे दिसत नाही. (प्रतिनिधी)क्षीरसागर-पवार कसे एकत्र येणार ?शिवसेनेने महानगरपालिकेवर भगवा फडकविण्याचा निर्धार केला असून, आमदार क्षीरसागर यांनी तशी तयारीही सुरू केली आहे. पक्षानेही महापालिकेची जबाबदारी क्षीरसागर यांच्या खांद्यावर सोपविली आहे. सुवर्णमहोत्सवी वर्षाचे निमित्त साधून क्षीरसागर शहरात भगवा सप्ताह साजरा करत आहेत. सदस्य नोंदणीचा कार्यक्रमही व्यापक प्रमाणात घेतला आहे, परंतु निवडणुकीला सामोरे जात असताना आ. क्षीरसागर व जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्यातील वाद कसा मिटवणार याचेही कोडेच आहे. पवार हे नेहमी आपल्या विरोधातच असतात, असा समज झालेल्या आमदार क्षीरसागर यांनी स्वत:च निवडणुकीला सामोरे जायची तयारी सुरु केली आहे. पवार यांना मानणाराही शिवसैनिकांचा गट असून त्यांनी शहरातील २० ते २२ मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले आहे. पक्षाने आपल्यावर जबाबदारी सोपविल्याचे सांगत क्षीरसागर पुढे चालले आहेत, तर मनपावर भगवा झेंडा फडकाविण्याची आपलीही इच्छा असल्याचे सांगत पवार कामाला लागले आहेत. दोघांना योग्यवेळी पक्षनेतृत्वाकडून सल्ले देण्यात येतील आणि त्यानंतर दोघे एकत्रपणे काम करतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते; परंतु, इतक्या वर्षाचा दुस्वास कमी होण्याची शक्यता फारच धुसर आहे. शिवाय दोघांनीही आपापल्या कार्यकर्त्यांना तयारीला लागा, असे सांगितल्याने माघार कुणी घ्यायची, असाहा तिढा तयार होणार आहे.
शिवसेना-भाजप युती अशक्य
By admin | Published: June 24, 2015 12:35 AM