कोल्हापूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत रविवारी शिवसेना-भाजपने लोकसभा निवडणुकीचे रणशिंगच फुंकले. या दोन्ही निवडणुकांमध्ये कोल्हापुरात घवघवीत यश मिळविण्याचा निर्धार सर्वच नेत्यांनी मुठी आवळून केला.‘‘कोल्हापुरात लोकसभेला चांगले यश मिळाले, परंतु विधानसभेला जरा पुढे-मागे झाले. त्यामुळे अपेक्षित यश मिळाले नाही. ती कसर आगामी निवडणुकीत भरून काढा. आमदार व खासदार यांनी परस्परांच्या विजयाची जबाबदारी घ्या,’’ असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजावले.प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ‘‘तीन कोटी नागरिकांपर्यंत मोदी सरकारच्या कल्याण योजना पोहोचवायच्या असून, २५ लाख युवा वॉरियर्स तयार करायचे आहेत. कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही मतदारसंघांत युतीची ताकद तयार करायची आहे.’’मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नातही बूथ आणि बूथप्रमुख दिसतात. नेता कसा असावा, हे शाह यांनी दाखवून दिले आहे.’’यावेळी आमदार प्रकाश आवाडे, राहुल आवाडे आणि मौसमी आवाडे यांनी शाह यांचा सत्कार केला. यावेळी सुुरेश हाळवणकर, राहुल चिकोडे यांचीही भाषणे झाली. व्यासपीठावर माजी मंत्री भरमूआण्णा पाटील, माजी आमदार अमल महाडिक, शौमिका महाडिक, सत्यजित कदम, महेश जाधव, विजय जाधव, हिंदूराव शेळके, अशोक देसाई यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाराणसीच्या धर्तीवर अंबाबाई तीर्थस्थळ विकास कराखासदार धनंजय महाडिक यांनी सफाईदार हिंदीमध्ये भाषण केले. ते म्हणाले, ‘‘आज अमित शाह यांच्या स्वागतासाठी कोल्हापूरमध्ये चौकाचौकात गर्दी झाली. साखर कारखानदारीतील जे प्रश्न सुटणे असंभव वाटत होते, ते प्रश्न शाह यांनी सोडविले. १० हजार कोटींचा साखर कारखान्यांवरील आयकर रद्द केला. वाराणसी आणि उज्जैनप्रमाणे अंबाबाईचा तीर्थक्षेत्र विकास करावा आणि कोल्हापूरमध्ये खंडपीठ व्हावे, यासाठी आपण लक्ष घालावे.’’