कोल्हापूर : बेळगाव महापालिकेसमोर लाल-पिवळा झेंडा फडकविल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी सायंकाळी शिवसेनेने उचगाव पेट्रोलपंप येथे राष्ट्रीय महामार्ग रोखला. कर्नाटकची वाहने अडवून भगव्या रंगाने ‘जय महाराष्ट्र’ असे लिहिण्यात आले. शनिवारी बंदवेळी एकही कर्नाटकचे वाहन येथून जाऊ देणार नाही, असा इशारा देण्यात आला.
आज, शनिवारी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील कन्नड व्यावसायिकांचे व्यवसाय बंद ठेवण्यात येणार आहेत. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर शिवसेनेच्यावतीने शुक्रवारी सायंकाळी कर्नाटकची वाहने अडवून भगव्या रंगाने ‘जय महाराष्ट्र’ असे लिहून कर्नाटकचा निषेध केला. आज, शनिवारी वाहने आली तर तीव्र आंदोलन होईल, असा इशाराही दिला. सुमारे तासभर येथील वाहतूक ठप्प झाली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार, शिवाजी जाधव, राजू यादव, मंजित माने, शशी बिडकर, प्रतीक क्षीरसागर, राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते.
प्रतिक्रिया
बेळगाव महापालिका येथे लाल-पिवळा ध्वज लावून सीमा बांधवांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम कर्नाटकने केेले आहे. हा ध्वज त्वरित काढण्यासाठी शनिवारी सर्व कन्नड व्यवसाय बंद ठेवू. सकाळी ६ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत राष्ट्रीय महामार्गावर कर्नाटकचे एकही वाहन सोडले जाणार नाही.
विजय देवणे, जिल्हाप्रमुख शिवसेना
प्रतिक्रिया
मराठी बांधवांवर अन्याय केल्यास त्याच पद्धतीने येथील कर्नाटकातील नागरिकांचे नाक दाबू. बेळगावातील संबंधित संघटना केंद्र शासन, भाजप पुरस्कृत आहे.
संजय पवार, जिल्हाप्रमुख, शिवसेना
चौकट
शिवसेनेच्या आंदोलनाची माहिती कर्नाटकला
मध्यवर्ती बसस्थानकामध्ये कर्नाटकमधून येणारी वाहने अडवण्याचे आंदोलन करण्यासाठी शिवसैनिक शुक्रवारी सायंकाळी ५ च्या सुमारास जमा झाले होते. मात्र, याची माहिती कर्नाटकमधील वाहनचालकांना समजली. त्यांनी शाहू नाका येथे प्रवाशांना उतरुन माघारी पळ काढला. यामुळे शिवसैनिकांना उचगाव येथे आंदोलन करावे लागले.
फाेटो : १९०३२०२१ कोल शिवसेना आंदोलन
कोल्हापूर : कोल्हापूर शिवसेनेच्यावतीने बेळगाव येथील लाल-पिवळा ध्वज हटविण्याच्या मागणीसाठी उचगाव पेट्रोल पंपासमोरील पुणे-बंगळुरू राष्ट्रीय मार्ग रोखला. कर्नाटकची वाहने अडवून त्यावर जय महाराष्ट्र लिहिण्यात आले.