कोल्हापूर : शिवसेनेच्या राष्ट्रीय महाअधिवेशनाच्या निमित्ताने कोल्हापूरच्या महासैनिक दरबार हॉल परिसरामध्ये नोंदणीसाठी शिवसैनिका पदाधिकाऱ्यांची मोठी गर्दी झाल्याचे चित्र दिसून येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे थोड्या वेळामध्ये कोल्हापूरमध्ये दाखल होणार असून त्यांच्या उपस्थितीमध्ये या महाधिवेशनाचा प्रारंभ होणार आहे.
या अधिवेशनासाठी गुरुवारपासूनच राज्य मंत्रिमंडळातील शिवसेनेचे मंत्री, खासदार, आमदार, कार्यकारणी मधील पदाधिकारी दाखल झालेले आहेत अधिवेशनाच्या प्रारंभानंतर संघटनात्मक विषय चर्चेला घेण्यात येणार असून भोजनानंतर राजकीय विषयावर चर्चा होणार आहे संध्याकाळी सहा नंतर सरकारी योजना याविषयी कार्यशाळा होणार असून संध्याकाळी सात नंतर मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. याच दरम्यान मुख्यमंत्री शिंदे हे केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये कोल्हापूर प्रेस क्लबच्या पुरस्कार वितरणाला उपस्थित राहणार असून याचवेळी ते शहरातील प्रमुख काही संघटनांशी चर्चा करणार आहेत.
अधिवेशन आणि शहर परिसरामध्ये बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, एकनाथ शिंदे यांच्यासह नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचे मोठे कट आउट उभारण्यात आले असून पूर्ण शहर हे भगव्या झेंड्याने सुशोभित करण्यात आलेले आहे. अधिवेशनाच्या प्रवेशालाच महाराष्ट्रातील विविध विभागांच्या नोंदणीसाठी पदाधिकाऱ्यांची मोठी गर्दी झाली आहे. या ठिकाणी कोकण, मुंबई, पूर्व विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ असे वेगवेगळे विभाग करण्यात आले असून यामध्ये नोंदणी केलेल्या पदाधिकाऱ्यांना आयकार्ड, शिवसेनेचा मफलर, नोटपॅड असे साहित्य देऊन मुख्य मंडपामध्ये पाठवण्यात येत आहे. एकूणच या अधिवेशनाच्या निमित्ताने शिवसेना मोठ्या प्रमाणावर शक्तिप्रदर्शन करत असल्याचे चित्र या ठिकाणी दिसून येत आहे.