कोल्हापूर: खरीप हंगाम तोंडावर आल्याने अकरा वाजता बंदच्या निर्णयामुळे खते, बियाणे, औषधे खरेदीची गैरसोय होत असल्याने कृषी सेवा केंद्रे पूर्णवेळ चालू ठेवावीत अशी मागणी शिवसेनेने कृषी विभागाकडे केली आहे.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शुक्रवारी दुपारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर शेतकऱ्यांची कैफीयत मांडली. सोयाबीन बियाणे टंचाईच्या बाबतीतही लवकरात लवकर निर्णय घेऊन पेरणी सुरु होण्याआधी सेवा केंद्रांना बियाणांचा पुरवठा करावा असेही सांगितले. यावर कृषी अधीक्षक वाकुरे यांनी प्रत्येक तालुक्यात घरगुती बियाणे उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांची यादी कृषी अधिकाऱ्यांकडे तयार ठेवली आहे, तेथे बियाणे मिळेल असे सांगितले. तसेच महाबीज व खासगी कंपन्यांकडून बियाणे उपलब्ध होईल तसा पुरवठा सुरु असल्याचेही सांगितले.
दरम्यान, खरिपाच्या पार्श्वभूमीवर कृषी सेवा केंद्रे व कृषीशी संबंधित दुकाने दिवसभर सुरू ठेवावीत यासाठी शिवसेनेमार्फत कृषी मंत्र्यांकडे निवेदन पाठवण्यात आले आहे. पूर्णवेळ दुकाने सुरु ठेवण्याच्या कृषी आयुक्तांनी काढलेल्या सूचनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन देणार असल्याचे देवणे यांनी सांगितले.