समीर देशपांडेकोल्हापूर : जिल्ह्यातील राजकीय कार्यकर्त्यांच्या नजरा आता मुंबईकडे लागल्या आहेत. गेल्या आठवड्यात शुक्रवारी राज्यसभा निवडणुकीच्या माघारीच्या शेवटच्या दिवशी कोणीही माघार न घेतल्याने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार आणि माजी खासदार भाजपचे धनंजय महाडिक यांच्यातील लढत अटळ बनली. मतदान प्रक्रिया किचकट असल्याने नेमका कोणाचा ‘राजकीय गेम’ होणार हे शुक्रवारी (१० जून) कळणार आहे.
या निवडणुकीमध्ये पहिल्यापासून कोल्हापूरच चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले. सुरुवातीला माजी खासदार आणि पुन्हा इच्छुक असलेले संभाजीराजे यांनी महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवारीसाठी प्रयत्न केला. यासाठी अपक्ष लढण्याचा आणि स्वराज्य संघटना काढण्याचा निर्णय जाहीर केला; परंतु शिवसेनेच्या नकारानंतर त्यांनी तलवार म्यान केली. याचदरम्यान शिवसेनेने कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनाच उमेदवारी देत आश्चर्याचा धक्का दिला.
गोष्ट इथेच संपली नाही, तर भाजपनेही तातडीने माजी खासदार धनंजय महाडिक यांना मुंबईला बोलावून घेतले. तरीही महाडिक यांना रिंगणात उतरवले जाणार की नाही, याचा ‘सस्पेन्स’ कायम होता. दिल्लीतून पहिल्यांदा भाजपचे दोन्ही उमेदवार जाहीर झाले; परंतु त्यात महाडिक यांच्या नावाचा समावेश नव्हता. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होईल, अशी चर्चा सुरू होईपर्यंत दोन तासांत लगेचच महाडिक यांचीही उमेदवारी जाहीर झाली आणि परिस्थिती आणखी रंगतदार बनली.
याचदरम्यान संभाजीराजे यांची फसवणूक नेमकी कोणी केली यावर राज्यभर राजकीय परिसंवाद रंगला; परंतु खुद्द शाहू छत्रपती यांनी संभाजीराजेंना उघडे पाडत, याची पावती देवेंद्र फडणवीस यांच्या नावे फाडून टाकली, याचीही राज्यभर चर्चा रंगली. अर्ज भरले गेले. चर्चा सुरू झाल्या. शुक्रवारी बिनविरोध करण्यासाठी औपचारिक गाठीभेटी झाल्या; परंतु लढायचेच नक्की झाले आणि जे ते जोडणीला लागले.
पवार आणि महाडिक यांच्या मर्यादा
या निवडणुकीत उमेदवार म्हणून पवार यांना व्यक्तिगत खूपच मर्यादा आहेत. महाडिक यांनी याआधी खासदार म्हणून काम केल्याने, तसेच कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांना ते ओळखतात; परंतु त्यांनी भाजप आणि महाडिक परिवाराची ताकद वापरत राज्यभरातील अपक्षांसह आमदारांची त्या- त्या जिल्ह्यात जाऊन भेट घेण्याचा सपाटा लावला आहे, तर संजय पवार यांना वैयक्तिक मर्यादा असल्या तरी शिवसेना नेत्यांच्या माध्यमातून त्यांनीही भेटीगाठी सत्र सुरू ठेवले आहे. पवार यांची संपूर्ण भिस्त उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यावर, तर महाडिक यांची देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यावर आहे.दादांचा वाढदिवस कसा साजरा होणार...
१० जून हा चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस आहे. तो संस्मरणीय ठरतो का, हे पाहणे औत्सुक्याचे आहे. जिल्ह्यात शिवसेनेचे दोन खासदार, एक आमदार, काँग्रेसचे सहा आमदार, राष्ट्रवादी दोन, जनसुराज्य एक आणि अपक्ष दोन, अशी स्थिती असताना भाजपची पाटी कोरीच आहे. त्यामुळे महाडिक यांच्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी आग्रही भूमिका घेतली. येत्या महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत ताकद लावण्यासाठी महाडिक निवडून यावेत यासाठी पाटील यांचे प्रयत्न आहेत.