विश्वास पाटीलकोल्हापूर : कोल्हापूरच्या राजघराण्याचे वारसदार माजी खासदार संभाजीराजे यांनी शिवसेनेचा भगवा ध्वज खांद्यावर घ्यायला नकार दिला तरी या राजघराण्याची पाती असलेल्या धुळ्याच्या कदमबांडे घराण्याचे वारसदार यशवर्धन कदमबांडे यांनी मात्र शिवसेनेची मशाल हाती घेतली. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे जी यांच्या हस्ते शिवबंधन बांधून त्यांनी आज मातोश्री येथे शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यशवर्धन हे भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सदस्य आहेत. त्यांचे वडिल राजवर्धन कदमबांडे हे भाजपचे नेते असून धुळे-नंदूरबार जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत.यशवर्धन यांच्या शिवसेना (उध्दव ठाकरे गट) प्रवेशाशी कोल्हापूरचेही कनेक्शन आहे. कोल्हापूरच्या राजर्षि शाहू महाराज यांचे चिरंजीव राजाराम महाराज यांच्या ताराबाई व विजयाराणी या पत्नी होत्या. ताराबाई यांची कन्या पदमाराजे व त्यांची हर्षवर्धन व राजवर्धन कदमबांडे ही मुले. त्यातील हर्षवर्धन यांचा १९९९ ला अपघाती मृत्यू झाला. विजयमाला राणीसाहेब यांनी पदमाराजे यांच्यावर जिवापाड प्रेम केले.
कोल्हापूरच्या समाज जीवनाशीही त्या एकरुप झाल्या होत्या. इचलकरंजी लोकसभा मतदार संघातून त्यांनी दत्तक प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या निवडणूकीत तत्कालीन लेफ्टनंट कर्नल एस.पी.पी.थोरात यांचा १९६७ च्या निवडणूकीत पराभव केला. त्यानंतर पुढे याच लोकसभा मतदार संघातून १९८४ ला राजवर्धन कदमबांडे यांनी शरद पवार यांच्या एस काँग्रेसकडून निवडणूक लढवली. त्यामध्ये त्यांना २ लाख ३४ हजार ३१९ मते मिळाली. काँग्रेसच्या बाळासाहेब माने यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. आता त्यांचेच चिरंजीव यशवर्धन हे ठाकरे गटात प्रवेश करत आहेत.महाराष्ट्राच्या राजकारणात राज्यसभा निवडणूकीवेळी मोठे रणकंदन झाले. त्याची सुरुवात माजी खासदार संभाजीराजे यांच्या उमेदवारीपासून झाली. त्यांना भाजपने राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून राज्यसभेवर संधी दिली. भाजपने त्यांच्या खासदारकीला मुदतवाढ दिली नाही. म्हणून महाविकास आघाडीने आपल्याला राज्यसभेवर पाठवावे असे त्यांचे प्रयत्न होते. महाविकास आघाडीत ही जागा शिवसेनेची होती. त्यांनी अगोदर शिवबंधन बांधा असा आग्रह धरला. त्यास संभाजीराजे तयार झाले नाहीत. म्हणून शिवसेनेने कोल्हापूरच्याच संजय पवार यांना संधी दिली. भाजपने कोल्हापूरच्याच माजी खासदार धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली. राजकीय उलथापालथ होवून भाजपने ही जागा जिंकली आणि महाविकास आघाडी सरकारची पडझड तिथूनच सुरु झाली.