प्रवीण देसाईकोल्हापूर : शिवसैनिकांना एखाद्या कामासाठी मंत्रालय पातळीवर हेलपाटे मारावे लागू नयेत, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सेनाभवन येथे स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित केली आहे. जिल्हास्तरावरून आलेली शिवसैनिकांची कामे सेनाभवन येथे स्वीकारून नंतर ती पुढील कार्यवाहीसाठी मंत्रालयात पाठविली जाणार आहेत. ‘सेनाभवन ते मंत्रालय’ असा सेतू तयार करून शिवसैनिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न झाला आहे.राज्यात सरकार आपले असले तरी कामे सहजरीत्या होत नाहीत. त्यासाठी मंत्रालयाबाहेर तिष्ठत बसावे लागते. असा अनुभव जवळपास सर्वच राजकीय पक्षाच्या बहुतांश कार्यकर्त्यांना येत असतो. शिवसैनिकांनाही असे अनुभव येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांची कामे सहजरीत्या होण्यासाठी ‘सेनाभवन ते मंत्रालय’ असा सेतू तयार करण्यात आला आहे.
यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्वच जिल्हाप्रमुखांना निर्देश दिले आहेत. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील शिवसैनिकाशी संपर्क साधून त्यांना या संकल्पनेविषयी माहिती देण्यास सांगितले आहे. त्यानुसार जिल्हाप्रमुखांकडून बैठका, मेळावे या माध्यमांतून शिवसैनिकांशी संवाद साधला जात आहे.गावपातळीवरील विकासकामांसाठी निधी मागणी, राजकीय स्वरूपाचे गुन्हे मागे घेणे, तसेच स्थानिक स्तरावरील अन्य कामे शिवसैनिकांनी जिल्हाप्रमुखांना कळवावीत. त्यानंतर ही कामे जिल्हाप्रमुखांच्या माध्यमातून सेनाभवन येथे जातील. त्या ठिकाणी असलेल्या यंत्रणेच्या माध्यमातून ती थेट मंत्रालयातील संबंधित विभागाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविली जाणार आहेत. आपल्या कामाचे काय झाले? तसेच ते कोणत्या टप्प्यावर आहे, याची माहिती संबंधित शिवसैनिकाला मिळणार आहे. शिवसैनिक हा केंद्रबिंदू मानून मुख्यमंत्र्यांनीही ‘सेनाभवन ते मंत्रालय’ असा सेतू बांधला आहे.
मंत्रालयातील जबाबदारी रवींद्र वायकर यांच्यावरमंत्रालयातील कामे निर्गतीकरणाची जबाबदारी माजी मंत्री रवींद्र वायकर यांच्यावर देण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रमुख म्हणून त्यांना कॅबिनेटचा दर्जा देण्यात आला आहे.
जिल्हाप्रमुखांना ग्रीन पासराज्याच्या कानाकोपऱ्यातून मंत्रालयात कामासाठी येणाऱ्या जिल्हाप्रमुखांनाही पासअभावी तिष्ठत राहावे लागते. त्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील त्यांचा प्रवेश सुकर होण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून लवकरच सर्व जिल्हाप्रमुखांना ‘ग्रीन पास’ दिले जाणार आहेत.
शिवसैनिकांची कामे पटदिशी व्हावीत, तसेच त्यांचा सन्मान राहावा याकरिता मुख्यमंत्र्यांनी ही संकल्पना मांडली आहे. त्या संदर्भात सर्व जिल्हाप्रमुखांना दिले असून, त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.- संजय पवार,जिल्हाप्रमुख, शिवसेना, कोल्हापूर