कोल्हापूर : महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी शिवसेनेकडून सर्व ८१ जागांवर निवडणूक लढविण्यासाठी तयारी सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात ४० प्रभागांवर लक्ष केंद्रित केले असून, पुढील आठवड्यापासून प्रत्येक प्रभागात जाऊन तेथील शिवसैनिक, पदाधिकारी, प्रभागातील प्रमुख व्यक्तींसोबत मिसळ पे चर्चा करुन पुढील दिशा ठरवली जाणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी दिली. शिवसेनेच्यावतीने शनिवारी बिंदू चौकात भाजपचे रावसाहेब दानवे यांचा निषेध करण्यात आला. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
पवार म्हणाले, महाविकास आघाडीच्या माध्यमातून महापालिकेची निवडणूक लढविण्याविषयी अद्यापही निर्णय नाही. ‘मातोश्री’वरून येणारा आदेश अंतिम असणार आहे. दरम्यान, सर्वच प्रभागात चाचपणी सुरू केली आहे. यापैकी ४० प्रभागांत प्रत्यक्ष कामही सुरू झाले आहे. येथील इच्छुकांना आरक्षणानुसार दाखले तयार ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. पुढील आठवड्यापासून प्रत्येक प्रभागात जाऊन मिसळ पे चर्चा केली जाणार आहे. यावेळी तेथील की पर्सनही उपस्थित असणार आहेत. प्रभाग व शहरातील प्रश्नांसंदभांत चर्चा केली जाईल.
चौकट
कट्टर शिवसैनिकांवर अन्याय होऊ देणार नाही.
महाविकास आघाडीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल. निवडणूक एकत्र लढवली तर नक्की फायदा होईल. मात्र, इच्छुक असणारे कट्टर शिवसैनिक तसेच निवडून येण्यास सक्षम असणाऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही. महाविकास आघाडीवेळी त्यांना सन्मान आणि त्यांचा विचार होणे अपेक्षित आहे.
चौकट
केवळ निवडणुकीपूर्वी शिवसेना आठवते
पदवीधर, शिक्षक मतदारसंघातील विजयी दोन्ही उमेदवारांनी आभाराचा साधा फोनही केला नाही. केवळ निवडून येण्यापूर्वी त्यांना शिवसेना आठवते, असा घणाघाती आरोप संजय पवार यांनी केला. शिवसैनिकाला फक्त लढ म्हणायचे हे योग्य नाही. आमच्याकडे आला नाही तरी चालेल, पण ‘मातोश्री’वर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार माना. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक व्हा, ते महाराष्ट्राला पोहोचल्यासारखे असल्याचेही पवार म्हणाले.