कोल्हापूर - सकल मराठा समाजाच्या आरक्षणासह अन्य मागण्यांबाबतच्या लढ्यासाठी महाराष्ट्राला दिशादायक ठरणाऱ्या मूक आंदोलनास आज, बुधवारी कोल्हापुरातून प्रारंभ होत आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर आंदोलनात सहभागी होणार आहेत. तर, इतरही नेते आंदोनलठिकाणी येत आहेत. आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळी सकाळी दहा वाजता सुरुवात झाली आहे.
मराठा आरक्षणाच्या मूक आंदोलनासाठी जिल्ह्यातील मंत्री, आमदार, खासदार हे मराठा समाजाच्या मागण्यांबाबत आपली भूमिका मांडणार आहेत. राज्यातील प्रमुख समन्वयक आंदोलनात सहभागी होणार असल्याचे खा. संभाजीराजे यांनी सांगितले. संभाजीराजे आंदोलनस्थळी पोहोचले असून इतरही मराठा समाजाचे नेते रवाना झाले आहेत. शिवसेना नेते आणि खासदार धैर्यशील माने हे सलाईन लावून आंदोलन ठिकाणी दाखल झाले आहेत. मराठा समाजासाठी कोणत्याही परिस्थितीत असलो तरी उपस्थित राहणार अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती, त्यानंतर धैर्यशील मानेंचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे.
चंद्रकांत पाटील सहभागी
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मराठा समाजाच्या मूक मोर्चा आंदोलनात सहभागी झाले आहेत. "मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जे जे आंदोलन करतील त्यांना पाठिंबा देणार, आज कोल्हापूरचा नागरिक म्हणून आंदोलनात सहभागी झालो आहे," अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली.
मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरात होणाऱ्या आंदोलनाला राज्यभरातून समन्वयक उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे कोल्हापूर शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या आंदोलनाला येणाऱ्या प्रत्येक समन्वयकाची नोंद कोल्हापूर पोलिसांनी ठेवली आहे. कोरोना संकटाचे सर्व नियम पाळून आंदोलन व्हावं, असं आवाहन देखील कोल्हापूर पोलीस दलाकडून करण्यात आलं आहे.
दरम्यान, आंदोलनाच्या तयारीची खा. संभाजीराजे आणि संयोगिताराजे छत्रपती यांनी मंगळवारी सकाळी पाहणी केली होती. त्यानंतर मराठा समाजातील समन्वयकांची बैठक घेतली. कोरोनाच्या नियमांचे पालन करून हे आंदोलन होईल, असे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले.