कोल्हापुरात लोकसभेसाठी जोरबैठका; मंडलिक, मानेंकडून प्रचार सुरू, काँग्रेस, स्वाभिमानीचीही संपर्क मोहीम
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2024 11:55 AM2024-02-24T11:55:00+5:302024-02-24T11:55:48+5:30
तुतारी चांगल्या वेळी वाजते, शाहू छत्रपतींनी शरदचंद्र पवार गटाच्या चिन्हाचे केले स्वागत
कोल्हापूर : उमेदवारी जाहीर होण्याची वाट न पाहता शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. मंडलिक यांनी पन्हाळा तालुक्यातील करवीर विधानसभा मतदारसंघातील गावांपासून प्रचार सुरू केला असून माने यांनी तर हातकणंगले, शिरोळसह सांगली जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये विकासकामांचे उद्घाटन अंतिम टप्प्यात आणली आहेत.
पुढील महिन्यात लोकसभा निवडणुका जाहीर होणार असून यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही जागांबाबत गेले महिनाभर चर्चा सुरू आहे. मंडलिक आणि माने यांनाच उमेदवारी मिळणार की यातील एका जागेवर भाजप दावा करणार इथंपासून महाविकास आघाडीकडून शाहू महाराज निश्चित असल्यापासून हातकणंगलेमध्ये राजू शेट्टी स्वतंत्र लढवणार इथपर्यंतच्या बातम्यांची वातावरण ढवळून गेले आहे. यात भाजपचे नेते मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज चौहान हेदेखील आज शनिवारी कोल्हापुरात येणार आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी वातावरण तापवायला सुरुवात केली आहे.
अशा वातावरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्याच आठवड्यात कोल्हापूरमध्ये जाहीर सभा घेऊन लोकसभा प्रचाराचा नारळच वाढवला आहे. त्यामुळे उमेदवारी निश्चित समजून मंडलिक यांनी गेल्या दोन दिवसांपासून आपल्या दौऱ्याला सुरुवात केली आहे. पहिले दोन दिवस त्यांनी करवीर विधानसभा मतदारसंघातील पन्हाळा तालुक्यातील गावांचा दौरा केला असून शुक्रवारी ते गगनबावडा तालुक्याच्या दौऱ्यावर होते. गावातील प्रमुखाच्या घरात सर्वांना बोलावून त्यांच्यासोबत चर्चा करण्याचे धोरण मंडलिक यांनी ठेवले आहे.
धैर्यशील माने यांनी गावोगावी विकासकामांच्या उद्घाटनांना सुरुवात केली असून सांगली जिल्ह्यातील शिराळा, वाळवा तालुक्याचाही दौरा सुरू केला असून शिरोळ, हातकणंगलेतील विविध गावातील विकासकामांचे उद्घाटन केले आहे. माने यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून कोणत्या गावात किती कामे मंजूर केली त्याची यादीच दिली होती. त्यानुसार आता हे उद्घाटन सुरू करण्यात आले आहेत.
जरी महाविकास आघाडीचा लोकसभा उमेदवार ठरला नसला तरी सध्या उमेदवार कोण यावरूनच घुसळण सुरू आहे. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली गोविंद पानसरे यांच्या स्मारकाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने पाटील यांनी डाव्या विचारांच्या सर्वांना एकत्र आणत तयारी सुरू केली आहे. हातकणंगले मतदारसंघात मेळावे घेत राजू शेट्टी यांनीही मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
तुतारी चांगल्या वेळी वाजते, शाहू छत्रपतींनी शरदचंद्र पवार गटाच्या चिन्हाचे केले स्वागत
कोल्हापूर : "तुतारी कायमच सगळीकडे कोणत्याही कार्यक्रमात आणि चांगल्या वेळी वाजत असते," या शब्दांत शाहू छत्रपती यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला मिळालेल्या चिन्हाचे स्वागत केले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला भारतीय निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह दिले. त्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला कोणते चिन्ह मिळणार याबाबत उत्सुकता होती. निवडणूक आयोगाने शरदचंद्र पवार गटाला तुतारी हे चिन्ह दिले आहे. यावर शाहू छत्रपती यांनी "तुतारी कायमच सगळीकडे कोणत्याही कार्यक्रमात आणि चांगल्या वेळी वाजत असते," या शब्दांत आनंद व्यक्त केला.