विश्वास पाटील
कोल्हापूर : रस्त्यावर राबणाऱ्या संजय पवार या कार्यकर्त्याला उचलून थेट देशाचे सर्वोच्च सभागृह समजले जाणाऱ्या राज्यसभेची उमेदवारी देण्याचे धाडस शिवसेनेने केले. असेच धाडस राष्ट्रवादीसह काँग्रेसही कधी तरी दाखवणार आहे का, अशी विचारणा राजकीय क्षेत्रातून होत आहे. विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त कोट्यातून बारा आमदारांना संधी देण्याचा विषय लोंबकळत पडला आहे.
राष्ट्रवादीने आपल्या कोट्यातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचे नाव पाठविले होते परंतु त्यांनी महाविकास आघाडीस सोडचिठ्ठी दिली असून आपल्या नावाचा विचार करू नये, असे पत्रच राज्यपालांना दिले आहे. त्यामुळे या जागेवर राष्ट्रवादीला आर. के. पोवार, व्ही. बी. पाटील, ए. वाय. पाटील अशा कार्यकर्त्यांना संधी देता येऊ शकते. घराण्यांचे व प्रस्थापितांचे राजकारण पोसणारा राष्ट्रवादी असा निर्णय घेईल का, हीच खरी उत्सुकता आहे.
शिवसेनेने त्यांच्या राजकीय वाटचालीत अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या आयुष्याचे सोने केले आहे. असेच सोने आता संजय पवार यांचे होत आहे. गुरुवारी राज्यसभेचा अर्ज भरायला गेल्यावर त्यांच्या एका बाजूला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व एका बाजूला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार होते. मागील बाजूस दोन-चार मंत्री, तितकेच खासदार उभे आहेत. पक्षाने त्यांना एवढा सन्मान दिल्याची समाजातून अतिशय चांगली प्रतिक्रिया उमटली आहे. शिवसेनेने जे मनात आले ते करून दाखविले, तसे इतर पक्ष त्यातून काही घेणार का, असाच प्रश्न जनमाणसांत विचारला जात आहे.
राष्ट्रवादीत आर. के. पोवारसारखा कार्यकर्ता शरद पवार यांच्याशी निष्ठा ठेवून तब्बल ४२ वर्षे राजकारणात आहे. त्यांनी ‘शब्द’ टाकला म्हणून त्यांनी दोनवेळा कोल्हापूर उत्तर मतदार संघातून विधानसभेची निवडणूक लढविली. अगोदर काँग्रेसमध्ये व १९९९ नंतर राष्ट्रवादीमध्ये ते पवार यांच्यासोबत आहेत. पक्षाने त्यांना जिल्हा बँकेत सत्तेची संधी दिली. पक्षाचा कोणताही कार्यक्रम असला की पक्ष आता त्यांच्याकडे आभार मानण्याचे काम तेवढे देतो. असल्या कार्यकर्त्यांना पक्षाने कधीतरी विधान परिषदेची संधी द्यावी, अशी मागणी ‘शिवसेना पॅटर्न’नंतर सुरू झाली आहे.
शिवसेनेने संभाजीराजे चिन्हावर लढायला तयार नाहीत म्हटल्यावर कोल्हापुरातच आणि ती ही सामान्य कार्यकर्त्याला संधी दिली. राष्ट्रवादीने राज्यपाल नियुक्त जागेबाबत असेच धोरण का राबवू नये, अशी विचारणा होत आहे. व्ही. बी. पाटील, ए. वाय. पाटील हे प्रस्थापित वर्गाचे राजकारण करत असले तरी ते ही अनेक वर्षे पक्षासाठी काम करत आहेत. त्यांचाही सन्मान पक्षाने केला पाहिजे.
तोंडी लावण्यापुरतेच..
पवार अधून-मधून बाबूराव पारखे यांच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला महापौर केल्याची आठवण सांगतात. ते खरे असले तरी पुन्हा तसे कधी घडलेले नाही. जिल्ह्यात त्याच त्याच घरात राष्ट्रवादीची सत्ता फिरत राहिल्याने पक्षाची वाढही खुरटली आहे.
राजा विरुद्ध प्रजा..
राजा विरुद्ध प्रजा हे कार्ड कागलच्या राजकारणाने जन्माला घातले. दिवंगत नेते सदाशिवराव मंडलिक विरुद्ध दिवंगत नेते विक्रमसिंह घाटगे यांच्यातील विधानसभेच्या चार व लोकसभेच्या एका निवडणुकीत हे कार्ड वापरले गेले. त्याचा घाटगे यांना नक्कीच त्यावेळी त्रास झाला. पुढे २००९ च्या मंडलिक विरुद्ध संभाजीराजे यांच्या लोकसभा निवडणुकीत या कार्डाचा वापर झाला. आता पुन्हा राज्यसभेच्या लढतीत शिवसेनेने हे कार्ड नव्याने बाहेर काढले.