कोल्हापूर: शहरातील आमदार शिवसेनेचाच हवा असा आग्रह बाळासाहेब ठाकरे यांचा होता. त्यामुळे तुम्ही आम्हाला ‘कोल्हापूर उत्तर’ द्या आम्ही तुम्हाला ‘आमदार’ देतो, असा शब्द शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला. ‘मातोश्री’वर दिवसभर जिल्ह्यातील दहाही मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. यावेळी आमदार मिलिंद नार्वेकर आणि माजी खासदार विनायक राऊत उपस्थित होते.उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, शहरप्रमुख सुनील मोदी, रवी इंगवले, जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, वैभव उगळे, संजय चौगले उपस्थित होते. यावेळी ठाकरे यांनी दहाही मतदारसंघांतील पदाधिकारी, शिवसेनेची स्थिती, महाविकास आघाडीतील अन्य पक्षांशी राजकीय संबंध कसे आहेत, याची माहिती घेतली.यावेळी शहरातील सर्वच पदाधिकाऱ्यांनी उत्तर मतदारसंघ शिवसेनेला मिळावा अशी आग्रही मागणी केली. आम्ही चार जण इच्छुक आहोत. त्यांच्यापैकी कोणालाही उमेदवारी द्या. आम्ही त्याच्या पाठीशी राहतो. तुम्ही उमेदवारी दिली तर शिवसेनेचा आमदार येथून निवडून येऊ शकतो, याची ग्वाही दिली. लोकसभेची जागा काँग्रेसला दिली आहे, आता ही जागा आपल्याकडे घ्या, असे सांगितले.
राधानगरी हा आपलाच मतदारसंघ असून, शाहूवाडी, शिरोळ, हातकणंगले येथून आपले उमेदवार याआधी निवडून आले आहेत, याचीही माहिती यावेळी देण्यात आली. मतदारसंघनिहाय ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. ज्या मतदारसंघात शिवसेनेची स्थिती चांगली आहे तेथे आग्रह धरतानाच आघाडीधर्म पाळण्याच्या सूचनाही यावेळी पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
दहा लाख घरात मशाल पोहोचवानवरात्राच्या काळात आपल्याला मिळालेले मशाल हे चिन्ह जिल्ह्यातील १० लाख घरांमध्ये पोहोचवा, अशी सूचना उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना केली. एका विधानसभा मतदारसंघात एक लाख मशाल चिन्ह याप्रमाणे दहाही मतदारसंघांत चिन्ह पोहोचवून लोकांच्या संपर्कात राहा असे सांगण्यात आले. त्यानुसार घटस्थापनेपासून या मोहिमेला सुरुवात करणार असल्याचे पवार आणि देवणे यांनी सांगितले.
‘माताेश्री’च्या बाहेर वादावादीशहरातील एका पदाधिकाऱ्याला एक उपशहरप्रमुख ‘मातोश्री’बाहेर दिसले. या बैठकीला उपशहरप्रमुख किंवा अन्य कोणी अपेक्षित नसल्याने या शहर पदाधिकाऱ्यांनी ‘तुम्ही इकडे कसे’ अशी विचारणा केली. याचा गैरअर्थ या शहरप्रमुखांनी घेतला आणि वादाला सुरुवात झाली. प्रकरण हमरीतुमरीवर आल्याने अखेर इतर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी केली आणि हा वाद मिटवला. मात्र शुक्रवारी संध्याकाळनंतर मुंबईतील ‘मातोश्री’बाहेरील या वादाची चर्चा कोल्हापुरात रंगली.