पदाधिकारी बदलाबाबत गेले दोन महिने चर्चा सुरू आहे. मात्र, कोरोनाच्या कहरामध्ये हा विषय मागे पडला. चारच दिवसांपूर्वी शिवसेनच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्यानंतर मग अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या राजीनाम्याचे बघू, असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार खासदार संजय मंडलिक यांनी शिवसेनेच्या नेत्यांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली होती.
आता तर दुधवडकर यांच्याच उपस्थितीमध्ये ही बैठक होणार असल्याने यामध्ये राजीनाम्याचाच निर्णय होण्याची शक्यता आहे. सध्या माजी आमदार सत्यजित पाटील, उल्हास पाटील आणि डॉ. सुजित मिणचेकर यांना मानणारे समर्थक या पदांवर आहेत. विशेष म्हणजे हे तिघेही खासदार धैर्यशील माने यांच्या लोकसभा मतदारसंघातील आहेत.
मात्र, आता खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर आणि माजी आमदार चंद्रदीप नरके हे आपल्या समर्थकांना ही पदे मिळावीत यासाठी प्रयत्नशील आहेत. जिल्हा परिषदेची मुदत संपण्यास अजूनही सात महिने आहेत. त्यामुळे एवढ्या कालावधीसाठी का असेना बदल करून कार्यकर्त्यांना संधी देण्याचा मंडलिक, आबिटकर, नरके यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलाची प्रक्रिया उद्यापासूनच सुरू झाल्याचे मानण्यात येते. स्वाभिमानीच्या डॉ. पद्माराणी पाटील यांच्या राजीनाम्याबाबत माजी खासदार राजू शेट्टी यांनाही निरोप देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
चौकट
राजीनाम्याचा नमुनाही तयार
दोन दिवसांपूर्वी राजीनामे नेमक्या कोणत्या नमुन्यात द्यायचे हे नमुनेही तयार करून घेण्यात आले आहेत. सभापतींनी राजीनामे हे अध्यक्षांकडे द्यावयाचे असतात. अध्यक्ष बजरंग पाटील हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. असे असले तरी या चौघांनी राजीनामे दिल्यानंतर पुढील प्रशासकीय कार्यवाही तातडीने होणार असून, लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
चौकट
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी नियमानुसार विभागीय आयुक्तांकडे प्रत्यक्ष जाऊन राजीनामा देण्याची पद्धत आहे. मात्र, सध्याचा कोरोनाचा काळ पाहता विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना प्राधिकृत करून त्यांनीच हा राजीनामा स्वीकारायचा, असाही पर्याय पुढे येऊ शकतो.