कोल्हापूर : जिल्हा परिषदेमधील पदाधिकारी बदल केला जाणार आहे; मात्र शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे झालेले नाहीत. माझी सगळ्यांना विनंती आहे, त्यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामे द्यावे, असे आवाहन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केले.
जिल्हा परिषदेमधील पदाधिकारी बदलाबाबत पालकमंत्री सतेज पाटील यांनी जबाबदारी घेतली आहे. याबाबत शिष्टमंडळ भेटत आहेत; मात्र शिवसेनेचे पदाधिकारी राजीनामा देण्यास विलंब करत असल्याचे समजले. त्यांना माझी विनंती आहे, तुम्हाला संधी देताना इतरांना थांबावे लागले होते. आता पदे भोगली आहेत, ठरल्याप्रमाणे राजीनामा दिले पाहिजेत. ग्रामविकास विभागाच्यावतीने निधी देताना आपण कधीही दुजाभाव केेलेला नाही. प्रचंड कामे केल्याने पदाधिकाऱ्यांनी समाधानाने राजीनामे द्यावेत, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
व्यापाऱ्यांनी संयम ठेवावा
पहिली व दुसरी कोरोना लाट कोल्हापुरात शेवटी आल्याने वेळाने ओसरते. चाचण्यांची संख्या वाढवल्याने रुग्णसंख्या वाढेल, व्यापाऱ्यांनी आठ-दहा दिवस संयम ठेवावा, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
अंबाबाई विकास आराखड्याला निधी देऊ
अंबाबाई विकास आराखडा प्रलंबित आहेत. सध्या कोरोनाचे संकट असल्याने निधीची कमतरता आहे. मात्र, आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर त्यासाठीही निधी देऊ, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.