म्हाकवे : हदनाळ (ता. निपाणी) येथे कर्नाटक प्रशासनाच्या दडपशाही धोरणाचा निषेध करत शिवसैनिकांनी भगवा झेंडा रोवला. शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख विजय देवणे यांना बेळगाव जिल्ह्यात येण्यासाठी बंदी केली होती. त्यामुळे देवणेसह शिवसैनिकांनी कर्नाटक पोलिसांना हुलकावणी देत शेंडूरच्या महाराष्ट्र हद्दीतून बेळगाव जिल्ह्यात असणाऱ्या हदनाळ गावात प्रवेश केला.
पुणे-बंगळुरू महामार्गावर कर्नाटक पोलिसांनी बंदोबस्त वाढविला होता. त्यामुळे त्यांना कर्नाटक हद्दीत प्रवेश करणे शक्य झाले नाही.
त्यांनी गनिमी काव्याने हदनाळ गावात प्रवेश करत तेथील चौकात भगवा फडकवला. सुमारे
अर्धा तास घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. जय भवानी-जय शिवाजी या घोषणा देतच त्यांनी पुन्हा शेंडूरमार्गे महाराष्ट्रात प्रवेश करत कर्नाटक शासनाच्या बंदी आदेशाला झिडकारून दिले. तसेच गावातील कन्नड भाषेतील फलक उतरविण्यात आले. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख अशोक पाटील, शिवगोंड पाटील, विकास पाटील, रामदास पाटील, बाबूराव
शेवाळे, प्रभाकर हात्रोटे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, याची माहिती
बेळगाव पोलिसांना मिळताच त्यांचा फौजफाटा हदनाळमध्ये दाखल झाला होता. मात्र पोलीस येण्यापूर्वीच आपल्या कार्यकर्त्यांसह देवणे यांनी महाराष्ट्रात प्रवेश करत केला होता.