कोल्हापूर: राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांच्या उमेदवारीवरून राज्यात बराच खल झालेला पाहायला मिळाला. अनेक दावे-प्रतिदावेही झाले. अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढण्यावर ठाम असलेल्या संभाजीराजेंनी राज्यभा निवडणुकीतून माघार घेताना याचे खापर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर फोडले आहे. तर, दुसरीकडे छत्रपती शाहू महाराजांनी या घडामोडींसाठी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना जबाबदार धरले आहे. यातच आता शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा याविषयावर प्रतिक्रिया देताना, संभाजीराजेंना पुढे करून राजकारण करणाऱ्यांची उडी फसली, अशी टीका केली आहे.
छत्रपतींना समर्थक नसतात, संपूर्ण प्रजाच छत्रपतींची असते. शिवसेनेचे मन साफ आहे, शिवसेना कधीही पाठीमागून वार करत नाही. शिवसेनेने आधीही भूमिका स्पष्ट केली होती की, शिवसेनेच्या दोन जागा आहेत. राज्यसभेत जायचे असेल तर तुम्ही शिवसेनेची उमेदवारी घ्यावी. आम्ही तुम्हाला आमची मते देऊ, याचा पुनरुच्चार संजय राऊत यांनी केला. ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.
संभाजीराजेंना पुढे करून राजकारण करणाऱ्यांची उडी फसली
सध्या कोल्हापूरमध्ये आहे. शाहू महाराजांना भेटून त्यांना अभिवादन करणे हे आमचे कर्तव्य आहे. आम्हाला जसा छत्रपती शाहू महाराजांबद्दल आदर आहे, तसाच संभाजीराजेंविषयी प्रेम आहे. आम्हाला वादातून राजकारण करायचे नाही. ज्यांनी संभाजीराजेंना पुढे करून राजकारण करण्याचा प्रयत्न केला त्यांची उडी फसलेली आहे. त्यांनी उडी मारण्याचा प्रयत्न केला, मात्र, शाहू महाराजांनी भूमिका घेतली त्याने त्यांची उडी फसली, असा दावा संजय राऊत यांनी केला.
दरम्यान, छत्रपती शाहू महाराज केवळ महाराष्ट्रासाठी नाही, तर देशासाठी आदरणीय आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि सध्याच्या शाहू महाराजांचे अत्यंत जिव्हाळ्याचे, कौटुंबिक संबंध होते आणि आजही आहेत. त्यांनी जी भूमिका घेतली त्यानंतर मी इतकेच म्हणालो की, कोल्हापूरच्या मातीत आजही प्रामाणिकपणा सत्य जीवंत आहे. शाहू घराण्याने आपली सत्यवादी परंपरा जीवंत ठेवली, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.