कोल्हापूर : जिल्हा परिषदेतील शिवसेनेच्या तीन सभापतींचे २ जूनला राजीनामे घेणार असल्याची माहिती संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी दिली. या बैठकीसाठी बांधकाम सभापती हंबीरराव पाटील आणि शिक्षण सभापती प्रवीण यादव यांनी दांडी मारल्यामुळे दुधवडकर संतप्त झाले. स्वाती सासने यांनी मात्र त्यांची भेट घेतली.शिवसेनेच्या तीनही सभापतींचे राजीनामे घेण्यासाठी दुधवडकर यांनी शासकीय विश्रामगृहावर गुरुवारी सकाळी १० वाजता बैठक बोलावली होती. त्यांच्यासमवेत खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, जिल्हाप्रमुख विजय देवणे, मुरलीधर जाधव उपस्थित होते. मात्र, राजीनामे देणारे तीनही सभापती बारा वाजले, तरी आले नसल्याने दुधवडकर संतप्त झाले.यानंतर देवणे आणि जाधव अर्धा तास बाहेर जावून आले. याच दरम्यान नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, जिल्हाप्रमुख संजय पवार, आजरा कारखान्याचे अध्यक्ष सुनील शिंत्रे आदी मान्यवरही या ठिकाणी दाखल झाले.
साडेबारा वाजून गेले तरी राजीनामा देणाऱ्यांपैकी कुणीही आले नसल्याने अखेर स्वाती सासने यांच्याशी संपर्क साधण्यात आला. पंधरा मिनिटांत त्या आल्या आणि त्यांनी दुधवडकर यांची भेट घेतली. यानंतर दुधवडकर आणि सासने यांनी राजीनाम्याविषयी पत्रकारांना माहिती दिली. याच दरम्यान मंडलिक गटाच्या शिवानी भोसले यांनी दुधवडकर यांची भेट घेतली. अर्जुन आबिटकर, विनायक साळोखे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.अन दुधवडकर संतापलेदुधवडकर येऊन दोन तास झाले, तरी राजीनामा देणाऱ्या तिघांपैकी एकही जण फिरकला नाही. हंबीरराव पाटील यांचे दोन्ही फोन बंद होते. प्रवीण यादव मिणचेकर यांच्यासोबत स्वॅब देण्यासाठी गेल्याचे सांगत होते. त्यामुळे दुधवडकर संतापले. त्यांनी माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर, डॉ. सुजित मिणचेकर, उल्हास पाटील यांच्यापैकी किंवा कोणत्या सभापतींना फोन लावला हे समजले नाही. परंतु तुम्हाला जे काही सांगायचे ते समोर येऊन सांगा ना. मी मुंबईहून येथे येऊन बसलो आहे आणि तुम्ही कुणीच येत नाही असे कसेह्ण अशी विचारणाच दुधवडकरांनी केली. त्यांचा वाढलेला आवाज दालनाबाहेर येत होता.इच्छुकांचे नेते वेळेत हजरसध्या शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांच्या मतदारसंघातील हे तीनही विद्यमान सभापती आहेत. आता ही पदे मंडलिक खासदार असलेल्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात मिळणार आहेत. मंडलिक, आबिटकर, चंद्रदीप नरके यांच्या गटाला ही पदे मिळणार आहेत. त्यामुळे मंडलिक, आबिटकर उपस्थित होते. परंतु राजीनामे देणाऱ्यांचे नेते सरूडकर पाटील, मिणचेकर, उल्हास पाटील अनुस्थित होते. पाटील हे नुकतेच दवाखान्यातून परतल्याचे सांगण्यात आले.मुरलीधर जाधव संतापूनच बैठकीतून बाहेरबैठक सुरू असताना मधूनच जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव संतापून बाहेर पडले. आम्ही ह्यास्नी निवडून आणायचं आणि नी...... असं म्हणतच ते गाडीत बसून कुठेतरी निघून गेले आणि अर्ध्या तासाने परत आले.
बैठकीला काही जण आले नाहीत. त्यांच्याशी, त्यांच्या नेत्यांशी संपर्क झाला आहे. दोन जूनला मी परत येणार आहे. त्याचदिवशी तिघांचेही राजीनामे होतील. त्यात अडचण नाही.- अरुण दुधवडकर,संपर्कप्रमुख शिवसेना
नेत्यांच्या आदेशाप्रमाणे इतर सभापतींच्याबरोबर मी देखील राजीनामा देणार आहे. त्यामध्ये कोणतीही अडचण नाही.स्वाती सासने,सभापती, समाजकल्याण समिती.