कोल्हापूर : विमा कंपन्यांनी राज्यातील शेतकऱ्यांची लूट सुरू केली होती. याविरोधात शिवसेनेने आक्रमकपणे जाब विचारल्याने कंपन्या नरमल्या आणि त्याचा मोबदला शेतकऱ्यांना मिळाला. राज्यातील १0 लाख शेतकऱ्यांना तब्बल ९६० कोेटी रुपये नुकसान भरपाई मिळाली, ही भरपाई शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामुळेच मिळाली असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने त्यांचे आभार मानत असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली.गेल्यावर्षी राज्यातील एक कोटी ४४ हजार शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी संबंधित कंपन्यांकडे अर्ज केले होते. त्यामध्ये विविध निकषांचा आधार घेत कंपन्यांनी ९० लाख शेतकऱ्यांना अपात्र ठरविले; त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते. या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी पक्षप्र्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यामध्ये लक्ष घातले.
शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या पीक विमा कंपन्यांविरोधात ठाकरे यांनी मुंबईत विराट मोर्चा काढत कंपन्यांच्या कारनाम्याचा पाढाच वाचला. कोणत्या निकषावर राज्यातील ९० लाख शेतकऱ्यांना अपात्र ठरवले, याचा जाब उद्धव ठाकरे यांनी कंपन्यांना विचारला.
१५ दिवसांत शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची भरपाई मिळवून द्यावी, असा अल्टिमेटम शिवसेनेने दिल्याने कंपन्या खडबडून जाग्या झाल्या आणि परताव्याच्या कामास गती आली. त्यातूनच १0 लाख शेतकऱ्यांना ९६० कोटी रुपये भरपाई मिळाल्याची माहिती आमदार क्षीरसागर यांनी दिली.शेतकऱ्यांचा पीक विमा निकषांच्या कात्रीत अडकू नये, यासाठी शिवसेनेच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन विमा कंपन्या कशा पद्धतीने मनमानी करतात, हे सांगितले. यावेळी शिवसेनेचे शहराध्यक्ष रविकिरण इंगवले, किशोर घाटगे, आदी उपस्थित होते.नुकसान ‘मंडल’ऐवजी गावावर ठरणार?विमा कंपन्या सरासरी नुकसान काढताना महसूल मंडल गृहीत धरून काढते. लहरी हवामानामुळे एका गावात अतिवृष्टी होते, पण त्याच्या शेजारील गावात कमी पाऊस होतो. परिणामी मंडलाचे सरासरी नुकसानावर परिणाम होतो; त्यामुळे येथून पुढे ‘मंडल’ऐवजी गाव पातळीवरील नुकसान गृहीत धरावे, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे, त्यानुसार सुधारणा होणार असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.