कोल्हापूर : महापालिकेमध्ये महापौर निवडीकरिता भाजप-ताराराणी आघाडीला पाठिंबा देण्याबाबत पक्षश्रेष्ठींकडून कोणताही आदेश आला नसल्याने शिवसेना अद्याप तटस्थ आहे. स्थानिक पातळीवरील सर्व माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी वरिष्ठांकडे दिली आहे. पाठिंब्याबाबतचा निर्णय सोमवार (दि. १६)पर्यंत होण्याची शक्यता आहे. महापालिकेत सत्तास्थापनेसाठी कॉँग्रेस-राष्ट्रवादीकडून दावा करण्यात आला आहे. दोघांचे संख्याबळ पाहता बहुमताचा जादुई आकडा सहज पूर्ण होत आहे. त्याला पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ‘भाजप-ताराराणी आघाडीचाच महापौर होईल,’ अशी गुगली टाकून खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे कॉँग्रेस-राष्ट्रवादीने सावध पवित्रा घेत कोणताही दगाफटका होऊ नये, यासाठी आपल्या नगरसेवकांची मोट बांधली आहे. महापालिकेचा निकाल लागल्याच्या पहिल्या दिवसापासून शिवसेना आपल्यासोबत असल्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून सांगितले जात आहे; परंतु त्यावर शिवसेनेकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. शिवसेनेचे चार नगरसेवक निवडून आलेले आहेत. कल्याण-डोंबिवलीच्या पाठिंब्यानंतर पाहू, असे वरिष्ठांकडून सांगण्यात आले होते. या ठिकाणी भाजपने पाठिंबा दिला. त्यामुळे कोल्हापुरात पाठिंबा मिळेल, अशी शक्यता गृहीत धरली जात आहे; परंतु स्थानिक पातळीवर अद्याप सहकार्याबाबत कोणतीही बोलणी झालेली नाहीत. त्यामुळे सद्य:स्थितीला शिवसेना तटस्थच आहे. असे असले तरी भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांची व शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची या संदर्भात चर्चा सुरू आहे. पक्षाच्या नेत्यांना येथील राजकीय परिस्थितीची माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे. सोमवार (दि. १६) पर्यंत पाठिंब्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
शिवसेना अद्याप तटस्थ
By admin | Published: November 14, 2015 12:56 AM