..तर कोल्हापुरातही मैत्रीपुर्ण लढत, शिवसेनेने शाहू छत्रपतींचा प्रचार थांबवला; सांगलीच्या जागेवरुन गुंता
By राजाराम लोंढे | Published: March 30, 2024 01:08 PM2024-03-30T13:08:32+5:302024-03-30T13:15:14+5:30
काँग्रेसवर दबावाचे राजकारण; देवणे, शिंत्रे, संजय पवार कोकणात तर मोदी प्रचारासाठी सांगलीत
कोल्हापूर : सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने मैत्रीपुर्ण लढतीची तयारी सुरु केल्याने शिवसेनेमध्ये (उबाठा) अस्वस्थता पसरली आहे. काँग्रेसवर दबाव टाकण्यासाठी शिवसेनेने ‘कोल्हापूरा’तील काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारातून काहीसे अंग काढून घेतल्याचे चित्र आहे. त्याचाच भाग म्हणून शिवसेनेचे उपनेते संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे हे कोकणात तर शहरप्रमुख सुनील मोदी हे सांगलीला प्रचारासाठी गेले आहेत.
सांगली लोकसभा मतदारसंघात शिवसेनेने (उबाठा) डब्बल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली आहे. मैत्रीपुर्ण लढतीची तयारी काँग्रेसने केल्याने चंद्रहार पाटील यांच्या समोरील अडचणी वाढल्या आहेत. काँग्रेसने दबाव वाढवल्यानंतर शिवसेनेनेही कॉग्रेसच्या उमेदवाराच्या ठिकाणी दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे.
त्यातूनच गेल्या आठ-दहा दिवस काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारात सक्रीय असणारे शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांना प्रचारापासून अलिप्त राहण्याचे आदेश ‘मातोश्री’वरुन आले आहेत. त्यानुसार संजय पवार, विजय देवणे, सुनील शिंत्रे आदी पदाधिकारी हे शिवसेनेचे सिंधुदुर्ग -रत्नागिरी’चे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी गेले आहेत. तर सुनील मोदी हे चंद्रहार पाटील यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी सांगलीला गेले आहेत.
पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेच्या हाती धोपाटने
पश्चिम महाराष्ट्रातील दहा लोकसभेच्या जागेपैकी शिवसेनेला ‘मावळ’, ‘हातकणंगले’ मतदारसंघ सोडले होते. त्यातील ‘हातकणंगले’त शेट्टींना पाठींबा देण्याचा आघाडीचा निर्णय झाल्याने या जागेचा त्यांना उपयोगच नाही. त्यामुळे ‘सांगली’ची जागा त्यांनी घेतली, तीही सोडायची म्हटले तर शिवसेनेच्या हाती धोपाटणेच येणार हे निश्चित आहे.
तर, कोल्हापूरातही मैत्रीपुर्ण लढत
काँग्रेसने सांगलीत मैत्रीपुर्ण लढत देण्याचा निर्णय घेतला तर महाराष्ट्रात तसेच करु, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे. त्यानुसारच, कोल्हापूरातही मैत्रीपुर्ण लढत देऊया त्याची तयारी सुरु करा, अशा सूचना ‘मातोश्री’वरुन आल्या असून त्यातूनच डॉ. चेतन नरके, विजय देवणे यांचे नाव पुढे येऊ शकते.