कोपार्डे : करवीर तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी स्थानिक पातळीवर मोर्चेबांधणीसाठी सुरुवात झाली आहे. गटातटांचे राजकारण दिसणार असले तरी आमदार पी. एन. पाटील व माजी आमदार चंद्रदीप नरके यांचे आता स्थानिक पातळीवर प्रबळ गट असल्याने विधानसभेला जशी शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशी ईर्षेने निवडणूक लढली गेली, तशीच लढत ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतही दिसणार आहे.
करवीर तालुक्यात ज्या ५४ ग्रामपंचायतीचे प्रभाग निश्चित झाले व मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या त्यांत ३० ग्रामपंचायती शहरालगतच्या आहेत. यात प्रामुख्याने मोठ्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यात बालिंगा, हणमंतवाडी, पाडळी खुर्द, शिये,कोपार्डे, खुपीरे, कुडित्रे, शिये,न्यु वाडदे, हळदी, देवाळे, वडकशिवाले, साबळेवाडी, इस्पुर्ली, गिरगाव, भुयेवाडी, पडवळवाडी, केर्ले, मुडशिंगी, कोगे, सडोली खालसा, निगवे दुमाला, तामगाव या मोठ्या गावांचा समावेश आहे. या गावांत आजही शिवसेना व काँग्रेसचे गट प्रभावी आहेत. समोर जिल्हा बँक, गोकुळ, महानगरपालिका निवडणूक असल्याने या गावात सत्ता स्थापन करून आपली राजकीय ताकद निर्माण करण्यासाठी व या निवडणुकीत आपल्याला कोणी आव्हान निर्माण करू नये यासाठी पी. एन. पाटील व माजी आमदार चंद्रदीप नरके प्रयत्न करणार यात शंका नाही.
पण शहरालगतच्या गावांत आजही शिवसेनेचा प्रभाव असल्याने या गावांवर आपली पकड घट्ट करून पुढील विधानसभा निवडणुकीसाठी माजी आमदार चंद्रदीप नरके आतापासूनच पेरणी करण्याच्या तयारीत आहेत. करवीरमध्ये प्रत्येक गावात काँग्रेसचा गट आहे; पण गेल्या १० वर्षांत आमदार नरके यांनी संपर्क वाढवून निर्माण केलेली तरुण कार्यकर्त्यांची फळी पुन्हा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून काँग्रेसकडे खेचण्यासाठी आमदार पी. एन. पाटील यावेळी विशेषतः शिवसेनेचा प्रभाव असणाऱ्या गावांत करण्यासाठी प्रयत्नशील राहणार.
राज्यात महाआघाडीची सत्ता आहे. राज्य व जिल्हा पातळीवरील निवडणुकांत हीच महाआघाडी भाजपविरोधात एकत्र लढत असल्याचे चित्र पुणे पदवीधर व शिक्षक आमदार निवडणुकीत दिसून आले आहे. पण विधानसभेला करवीरमध्ये शिवसेना व काँग्रेसमध्ये सरळ लढत झाल्याने स्थानिक पातळीवर म्हणजे ग्रामपंचायत निवडणुकीत असे चित्र दिसणार नाही हे निश्चित.
।। चौकट
करवीरमधील सर्वाधिक गावे गोकुळ संघाशी संलग्न आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत हीच परिस्थिती आहे. हद्दवाढीत सर्वाधिक गावे करवीरमधील असल्याने महानगरपालिकेच्या निवडणुकीतही या गावांची मोठी भूमिका असणार असल्याने सर्व राजकीय नेत्यांचे करवीरमधील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित होणार आहे.