कोल्हापूर : कितीही संपर्क अभियाने राबवा आणि विस्तार करा. भाजप या पुढच्या सर्व निवडणुकांमध्ये स्वबळावर लढून शिवसेनेला पंढरपूरच दाखवणार, अशी टीका माजी मंत्री आशिष शेलार यांनी केली.
जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या शेलार यांनी मंगळवारी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निमित्ताने कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. पक्ष कार्यालयात शहर आणि ग्रामीण कार्यकारिणीची त्यांनी बैठक घेतली. ते म्हणाले या पुढच्या काळात महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिकांच्या निवडणुका भाजप स्वबळावर लढवणार आहे. त्यामुळे आपले बलस्थान असलेली बूथ रचना आणखी मजबूत करा. घराघरांमध्ये भाजपचे सेवा कार्य पोहोचले पाहिजे.
शिवसेनेच्या संपर्क अभियानाबाबत विचारणा केली असता ते म्हणाले, ‘कोणीही कितीही अभियाने करोत, पण आगामी होणाऱ्या सर्व निवडणुकात शिवसेनेला पंढरपूरच दाखवणार. ईडी, इन्कम टॅक्सचे अधिकारी गुन्हेगारांच्याच मागे लागतात; परंतु निष्कारण याबाबत भाजपवर आरोप केले जात आहेत.
यावेळी जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव, सरचिटणीस अशोक देसाई, हेमंत अराध्ये, अजित ठाणेकर, विजयसिंह खाडे-पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
चौकट
एन. डी. पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस
या दौऱ्यात कोल्हापूरमध्ये आल्यानंतर शेलार यांनी ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. दिवसभरामध्ये त्यांनी समरजित घाटगे आणि अमल महाडिक यांच्या निवासस्थानी भेट दिली.