लोकमत न्यूज नेटवर्क
कसबा बावडा:
कसबा बावडा शिवसेनेच्या पाठीशी खंबीर उभा राहिला असून गेल्या बारा वर्षांत विविध विकासकामांच्या माध्यमातून कसबा बावडा परिसराच्या सर्वांगीण विकासाठी प्रयत्न केले आहेत. यंदा महापुराचा फटका कसबा बावड्यातील हजारो कुटुंबांना बसला असून मदत नाही तर कर्तव्य या भावनेतून प्रत्येक पूरग्रस्त कुटुंबाला शिवसेनेच्या वतीने मदत करण्यात येणार असल्याची ग्वाही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली.
कसबा बावडा येथील शिवनेरी, शिवसेना विभागीय कार्यालय येथून राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्याहस्ते प्रातिनिधिक स्वरूपात १०० कुटुंबांना शिवसाहाय्य जीवनावश्यक वस्तूच्या किटचे वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या आठवड्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वतीने कसबा बावड्यातील पूरग्रस्त भागातील नागरिकांना घरोघरी या शिवसाहाय्य जीवनावश्यक वस्तूच्या किटचे वाटप करण्यात येणार आहे.
यावेळी राजेश क्षीरसागर म्हणाले, राजाराम बंधाऱ्याच्या पर्यायी पुलाकरिता रु. १७ कोटी इतका निधी मंजूर केला आहे. यासह अन्य विकासकामासाठी आजतागायत रु. २.०० कोटींच्या वर निधी वितरित केला आहे. कसबा बावडा स्मशानभूमीची सुधारणा, पाणंद्यांचा विकास, विविध ठिकाणी ओपन जिम, खेळणी, हायमास्ट लॅम्प आदी विकासकामे करण्यात आली आहेत.
यावेळी राजेश क्षीरसागर यांना कसबा बावडा परिसरातील भगिनींनी राखी बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी कट्टर शिवसैनिक अक्षय खोत यांची अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या कोल्हापूर शहर जिल्हा अध्यक्ष पदावर नियुक्ती झाल्याबद्दल क्षीरसागर यांच्याहस्ते सत्कार केला. कार्यक्रमास शिवसेना उपशहरप्रमुख सुनील जाधव, विभागप्रमुख रवींद्र माने, राजू काझी, संजय लाड, उदय जाधव, गुरुदास ठोंबरे, राहुल माळी, अक्षय खोत, कपिल पोवार, विनायक बोनगे, सचिन पाटील, सचिन वावरे, दयानंद गुरव, जालिंदर पोवार, आदर्श जाधव आदी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
२२ बावडा राजेश क्षीरसागर
.
फोटो : कसबा बावडा येथील पूरग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते झाले. यावेळी शिवसेना उपशहरप्रमुख सुनील जाधव, तसेच रवींद्र माने, संजय लाड, राहुल माळी, राजू काझी आदी उपस्थित होते.
..................