कोल्हापूर : हंगाम संपत आला तरी कारखान्यांनी गाळप झालेल्या ७५ टक्के उसाचे पैसे शेतकऱ्यांना दिलेले नाहीत. त्यांच्यावर कारवाई का झाली नाही? शेतकऱ्यांचे पैसे मिळणार कधी? याबाबत विचारणा केल्याबद्दल आपण आमचा निषेध करता, तुम्हाला शिवसेनेची अॅलर्जी आहे. मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही दररोज इथे येणार, कोणी काही म्हणो शिवसेना कदापि थांबणार नाही, असा इशारा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी साखर सहसंचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांना सोमवारी दिला. ऊस उत्पादकांच्या मागण्यांसाठी शिवसेनेने तीन दिवसांपूर्वी लक्ष्मीपुरी साखर सहसंचालक कार्यालयातील वाय. व्ही. सुर्वे यांना हाकलले होते. त्यावेळी दिलेल्या आश्वासनांचे पुढे काय झाले? हे विचारण्यासाठी सोमवारी जिल्हाप्रमुख संजय पवार, मुरलीधर जाधव, विजय देवणे यांचे शिष्टमंडळ पुन्हा या कार्यालयात गेले होते. दरम्यान, सुर्वे कार्यालयीन कामानिमित्त बाहेरगावी गेल्याने कार्यालय अधीक्षक रमेश बारडे व विशेष लेखापरीक्षक डी. बी. पाटील यांच्याशी आंदोलकांनी चर्चा केली. सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या आदेशानुसार या कार्यालयासह परिसरात बंदोबस्त तैनात केला आहे. दरम्यान, पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी भेट दिली.मुरलीधर जाधव यांनी आंदोलन करताना आम्ही तुम्हाला मारले काय? आमचा निषेध का केला? असा जाब विचारला. त्यावर संजय पवार म्हणाले, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पळवून लावलेले त्यांना चालते पण आमचे आंदोलन चालत नाही. त्यांच्याविरुद्ध न्यायालयीन लढाईही लढू. यावेळी प्रवीणसिंह सावंत, दत्ताजी टिपुगडे, कमलाकर जगदाळे, बाजीराव पाटील, सुजित चव्हाण, आदी उपस्थित होते.नेहमीचेच सरकारी उत्तरशिवसेना पदाधिकाऱ्यांनी लेखी देण्याची मागणी केली. त्यावर सायंकाळीपर्यंत साखर आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधून लेखी देण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. कारवाईबाबत ठोस काही तरी होईल, असे अपेक्षा असतानाच नेहमीप्रमाणे सरकारी व गुळगुळीत उत्तर या कार्यालयाकडून मिळाले.
शिवसेना कदापि थांबणार नाही
By admin | Published: February 03, 2015 12:24 AM