कोल्हापूर : जिल्ह्यातील विद्यमान शिवसेनेच्या सहा आमदारांपैकी एकही जागा शिवसेना सोडणार नसल्याची स्पष्ट भूमिका परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी मांडली. पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.येथील शाहू स्मारक भवनमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाप्रमुख संजय पवार आणि मुरलीधर जाधव यांच्याअंतर्गत असणाऱ्या सहा तालुक्यांतील पदाधिकाऱ्याच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.रावते म्हणाले, ‘युतीचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घेणार आहेत; त्यामुळे त्याबाबतीत मी अज्ञानी आहे; मात्र संघटनेचे काम कसे चालले आहे, हे पाहण्यासाठी मी आलो आहे. युती झाली तर आम्ही सध्या जे काम करत आहोत, त्याचा फायदा आमच्याबरोबर युतीच्याही उमेदवाराला होईल. युती नाहीच झाली तर सर्व म्हणजे दहाही जागा लढविण्यासाठी आम्ही तयार आहोत.’यावेळी खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार सुजित मिणचेकर, प्रकाश आबिटकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.लोकप्रतिनिधींशी स्वतंत्र चर्चाया मेळाव्यानंतर रावते यांनी दोन्ही खासदार, आमदार आणि जिल्हाप्रमुखांशी स्वतंत्र खोलीत चर्चा केली.