कोल्हापूर : राज्यातील बहुचर्चित सिंचन घोटाळ्याची कबर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काढली आहे. त्या कबरीवर शिवसेना येत्या निवडणुकीत माती घातल्याशिवाय राहणार नाही, अशी घणाघाती टीका शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख आमदार दिवाकर रावते यांनी आज, शनिवारी येथे केली. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारमधील घोटाळेबहाद्दरांनी पोषण आहारातही घोटाळा करत चिमुकल्यांच्या तोंडचा घास हिरावल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.शिवसेनेतर्फे २४ जून ते २३ जुलै या कालावधीत ‘जय महाराष्ट्र-भगवा महाराष्ट्र’ हे अभियान हाती घेतले असून या अभियानांतर्गत ‘गाव तिथे शाखा’, ‘घर तिथे शिवसैनिक’, ‘प्रत्येकाच्या मनगटात शिवबंधन’, या माध्यमातून शिवसेना घराघरांत पोहोचविली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन करण्यासाठी कळंबा रोडवरील अमृतसिद्धी हॉल येथे जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी व लोकप्रतिनिधींचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी आ. रावते बोलत होते. रावते म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ‘जय महाराष्ट्र’ची दीक्षा सर्वांना दिली होती. त्यानंतरच हा शब्द प्रचलित झाला. आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘जय महाराष्ट्र-भगवा महाराष्ट्र’ हा नारा दिला आहे. या अभियानांतर्गत पक्ष घराघरांत पोहोचवून पक्षाचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत जावेत हे उद्दिष्ट आहे. अरुण दुधवडकर म्हणाले, लोकसभा पराभवाचे दु:ख खुद्द उद्धव ठाकरे यांना झाले असताना इथे मात्र एकाही तालुकाप्रमुखाने बैठक घेऊन आत्मचिंतन केले काय? अशी विचारणा करत तुम्ही जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख व खुद्द पक्षप्रमुखांनाही फसवत आहात, आपापसांत कुरघोड्या करून चालणार नाही.प्रा. संजय मंडलिक म्हणाले, लोकसभेतील यशानंतर शिवसेनेला आता सभासद नोंदणीच्या माध्यमातून विचारांची पेरणी करण्यासाठी अनुकुल वातावरण आहे. पराभवाने आपण नाउमेद झालेलो नाही. येत्या विधानसभा निवडणुकीत सर्व जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील राहू. यावेळी आ. राजेश क्षीरसागर, जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव, हर्षल सुर्वे, कमलाकर जगदाळे, आदींची भाषणे झाले. (प्रतिनिधी)
ंिसंचन घोटाळ्याच्या कबरीवर आता शिवसेना माती घालणार
By admin | Published: June 22, 2014 12:38 AM