कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार अपमान करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना १६ फेब्रुवारी रोजी शिवाजी विद्यापीठात होणाऱ्या दीक्षांत समारंभासाठी आमंत्रित केल्याबद्दल शिवसेना : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने सोमवारी कुलगुरूंची भेट घेऊन निषेध व्यक्त केला. कार्यक्रम स्थळीकाळी पट्टी बांधून ‘चले जाव’च्या घोषणा देत जेलभरो आंदोलन करण्यात येईल, असे यावेळी शिवसेनेने जाहीर केले.शिवसेना : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने सोमवारी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांची भेट घेतली. यावेळी जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार यांनी आपला निषेध कुलगुरुंजवळ व्यक्त केला.राज्यपाल भगतसिंह कोश्यारी महाराष्ट्रात वारंवार आणि जाणीवपूर्वक छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अनुद्गार काढत वादग्रस्त वक्तव्य करतात. याचा अनेक ठिकाणी शिवप्रेमी व राजकीय पक्षांनी व्यवहार बंद करून निषेध नोंदवला आहे. कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने असणाऱ्या शिवाजी विद्यापीठाने कोश्यारी यांना निमंत्रित करून स्वाभिमानी कोल्हापूरच्या जनतेवर मीठ चोळले आहे, कोल्हापूरची जनता हे कदापि सहन करणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला.दीक्षांत समारंभाच्या कार्यक्रमाला येण्यापूर्वी राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जाहीर माफी मागितली नाही तर दीक्षांत समारंभ स्थळी दुपारी १२ वाजता कोश्यारी यांच्याविरुद्ध काळी पट्टी बांधून ‘चले जाव’च्या घोषणा देत जेलभरो आंदोलन करण्यात येईल, असे शिवसेनेने सांगितले.यावेळी रविकिरण इंगवले, सुनील मोदी, हर्षल सुर्वे, मंजित माने, चंद्रकांत पाटील, लतीफ शेख, कमलाकर जगदाळे, पूनम फडतरे, राजेंद्र पाटील, अवधूत साळोखे, शशिकांत बिडकर, राजू जाधव, विनोद खोत, विशाल देवकुळे, राजू यादव, संतोष रेडेकर, अभिजित बुकशेट, प्रशांत भोसले आदी उपस्थित होते.
कोश्यारींविरोधात शिवसेना आंदोलन करणार, शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला बोलावल्याबद्दल केला निषेध
By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2023 7:00 PM