लोकमत न्यूज नेटवर्क,
गारगोटी : पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किमती, जाचक कृषी कायद्यांविरोधात शनिवारी भुदरगड तालुका शिवसेनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले. वाढलेल्या इंधनाच्या किमती तत्काळ कमी आणाव्यात या मागणीचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील म्हणाले, गेल्या सहा वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपने ‘अच्छे नव्हे, तर बुरे दिन’ आणले आहेत. महागाईचा आगडोंब उसळलेला असताना पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरात प्रचंड वाढ करून जनतेचे कंबरडे मोडले आहे. केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल व गॅसचे दर कमी करावेत, महागाई कमी करावी अन्यथा याचे दुष्परिणाम भाजप सरकारला भोगावे लागतील, असा इशारा त्यांनी दिला.
प्राचार्य अर्जुन आबिटकर म्हणाले, महागाईमुळे देशात गेल्या वर्षभरात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. दुसरीकडे भारतातील अब्जाधीशांची यादी वाढतच चालली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पेट्रोलच्या किमती कमी होऊनही भारतात मात्र चढ्या दरानेच पेट्रोलची विक्री केली जात आहे. केंद्र सरकारने तातडीने पेट्रोलच्या किमती कमी कराव्यात, अन्यथा भविष्यात शिवसेनेच्या वतीने उग्र आंदोलन उभारण्यात येईल,
यावेळी तालुकाप्रमुख अविनाश शिंदे, सरपंच धनाजी खोत, माजी उपसरपंच अरुण शिंदे, संग्राम सावंत, उपतालुकाप्रमुख थॉमस डिसोझा, अशोक दाभोळे, वसंत कांबळे, ग्रामपंचायत सदस्य सर्जेराव मोरे, सुशांत सूर्यवंशी, महिला संघटिका मेरी डिसोझा, मनीषा कदम, शहरप्रमुख तानाजी देसाई, रायाजी ढेंगे, कृष्णात देसाई यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
फोटो ओळ : शिवसेनेच्या वतीने महागाई, इंधन दरवाढ रोखण्यासाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रकाश पाटील, अर्जुन आबिटकर, अविनाश शिंदे, कृष्णात देसाई, तानाजी देसाई, आदी उपस्थित होते.