कोल्हापूर : पालघर निवडणुकीपासून ते कालच्या शिक्षक, पदवीधरच्या निवडणुकीपर्यंतचा निकाल पाहता भाजप आणि शिवसेना युती झाली तर त्यासमोर कुणाचाही टिकाव लागणार नाही हेच स्पष्ट झाले आहे अशी प्रतिक्रिया महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे. आम्ही दोघेही एकत्र आलो की खंबीर आणि स्थिर सरकार देवू शकतो हेच यातून स्पष्ट होते असेही ते म्हणाले.कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निकालानंतर प्रतिक्रिया विचारल्यानंतर पाटील यांनी या तीन निवडणुकांचा आढावा घेतला. ते म्हणाले, पालघरच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपच्या मतांची बेरीज केली तर ती कुठच्या कुठे जाते. त्यानंतर विधानपरिषद निवडणुकीत विरोधी लढूनही एकूण ७ जागांपैकी भाजप शिवसेनेने ५ जिंकल्या. कालच्या निवडणुकीतही विरूध्द लढूनही भाजप शिवसेनेने ४ पैकी ३ जिंकल्या. हे गणित पाहिल्यानंतर युतीसमोर कुणीही शिल्लक रहात नाही.मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेबाबत ते म्हणाले, हा रस्ता केंद्राच्या अखत्यारित आहे. त्याचे काम सुरू आहे.मात्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे हा मुद्दा मांडल्यानंतर संबंधित कंत्राटदारांना नोटीसा निघणार आहेत. त्यांच्याकडूनही ही दुरूस्ती केली जाईल. आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडील २२ हजार किलोमीटरचे रस्ते राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे वर्ग केले असून जिल्हा परिषदेचे ५0 हजारकिलोमीटरचे जिल्हा मार्ग सार्वजनिक बांधकामकडे देण्याचा विचार आहे.पीककर्ज वितरणाबाबत विचारणा केली असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या मुदद्यावर अतिशय संवेदनशील असून त्यांनी तसे आदेश दिले आहेत. मात्र स्टेट बँकेने कणेरी मठावर अडीच हजार शेतकऱ्यांचा कर्ज घ्या म्हणून मेळावा घेतला हा माझा अनुभव आहे असे पाटील म्हणाले.