लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शिवसेनेच्या वतीने २४ फेब्रुवारीपासून तीन दिवस कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघात संपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. पक्षसंघटना बळकट करण्याबरोबरच सभासद नोंदणी व शाखांचा आढावा घेतला जाणार आहे.
आगामी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीसह सहकारी संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने तयारी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी शिवसेनेचे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख, मंत्री, खासदार, आमदारांची वर्षा येथे बैठक घेतली. संपर्क अभियानासाठी राज्यासाठी टीम तयार केली असून कोल्हापूर लोकसभेसाठी आमदार योगेश कदम व हातकणंगले लोकसभेसाठी आमदार राजन साळवी यांची नियुक्ती केली आहे. २४ फेब्रुवारीला शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून अभियानास सुरुवात करण्यात येणार आहे. त्यानंतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी, शाखांच्या कामकाजाचा आढावा, सभासद नोंदणीतील प्रतिसाद, गटप्रमुखांशी चर्चा केली जाणार आहे. २६ फेब्रुवारीपर्यंत अभियान सुरू राहणार असून २७ फेब्रुवारीला अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात येणार आहे. मुंबईतील बैठकीला शिवसेनेचे कोल्हापूरचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हा प्रमुख संजय पवार, मुरलीधर जाधव, आमदार प्रकाश आबीटकर उपस्थित होते.
कोट-
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यासाठी ‘शिवसेना संपर्क अभियान’ जिल्ह्यात ताकदीने राबविणार आहे.
- संजय पवार (जिल्हाप्रमुख, शिवसेना)