बाबासो हळिज्वाळेकोगनोळी : कर्नाटक सरकार गेल्या ६० वर्षापासून मराठी बांधवांची गळचेपी करत आहे. दडपशाहीने ही मशाल रॅली कर्नाटक पोलिसांनी रोखल्याने आजही याचा प्रत्यय आला. पण आम्ही गनिमी काव्याने कर्नाटकात पोहचू आणि मराठी बांधवांना समर्थन देऊ, असे मत शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय देवणे यांनी कर्नाटक शासनाने त्यांचीमशाल रॅली कोगनोळी येथे अडवल्यानंतर व्यक्त केले.१ नोव्हेंबर हा कर्नाटक राज्य स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावेळी महाराष्ट्रात जाऊ इच्छिणारे मराठी बांधव मात्र प्रतिवर्षी काळा दिवस पाळतात. त्यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी कोल्हापूर शिवसेनेचे कार्यकर्ते आपली मशाल रॅली घेऊन कर्नाटकात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. याची माहिती मिळताच कर्नाटकच्या वतीने कोगनोळी येथील दूधगंगा नदी जवळ मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यांच्यासोबतच महाराष्ट्र पोलीस सुद्धा मोठ्या प्रमाणात तैनात होते. त्यामुळे या परिसरास पोलीस छावणीचे रूप प्राप्त झाले होते.शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय देवणे, संजय पवार ही मशाल रॅली घेऊन दूधगंगा नदीवर येताच कर्नाटक पोलिसांनी त्यांना रोखले. यावेळी पोलिसांनी पुढे जाण्यास मज्जाव केल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काही वेळ महामार्गावरच धरणे धरले. त्यानंतर दूधगंगा नदीपात्रात उतरून महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या या पाण्याच्या माध्यमातून आम्ही आमच्या मराठी बांधवांपर्यंत पोहोचलो असे म्हणून घोषणा दिल्या. यावेळी बेळगाव आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, बेळगाव बिदर भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणांनी शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला होता.यावेळी विजय देवणे, संजय पवार, रविकिरण इंगवले, प्रकाश शिरोळकर, सुनील मोदी, जयसिंग टीकिले, रियाज समनजी, समीर देसाई यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिरोळकरांच्या प्रवेशास सहमतीविजय देवणे व संजय पवार यांना बेळगाव जिल्हा प्रवेशास बंदी घालण्यात आली होती. यावेळी त्यांनी आमची एक व्यक्ती, मशाल व भगवा ध्वज बेळगाव पर्यंत जाऊ द्या अशी विनंती केल्याने प्रकाश शिरोळकर यांना बेळगाव पर्यंत जाण्यास पोलिसांनी अनुमती दिली. परंतु त्यांना मशाल व भगवा ध्वज नेता येणार नाही तसेच आमच्या वाहनाने त्यांना बेळगाव पर्यंत यावे लागेल या अटीमुळे शिवसैनिकांनी ही अनुमती नाकारली.
शिवसेनेची 'मशाल रॅली' कर्नाटक पोलिसांनी सीमेवरच रोखली, महामार्गावरच शिवसैनिकांचा ठिय्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 4:48 PM