कोल्हापूर : शिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषदेत आलेल्या पालकमंत्री सतेज पाटील यांनी पदाधिकारी बदल होणारच याबाबत स्पष्ट भूमिका घेतल्याने शिवसेना तिन्ही पदाधिकाऱ्यांचे राजीनामे अटळ मानले जात आहेत. या आठवड्यात ही प्रक्रिया पूर्ण होईल असे सांगण्यात येते. शिवसेनेचे संपर्कमंत्री आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत हे कोल्हापूरच्या दौऱ्यावर असल्याने त्यांच्यासमोरदेखील या विषयाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
पाटील हे रविवारी जिल्हा परिषदेत आले होते. शिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने गुढी उभारल्यानंतर चहासाठी ते अध्यक्ष बजरंग पाटील यांच्या दालनामध्ये आले. तेव्हा समाजकल्याण समितीच्या सभापती स्वाती सासने यांनी कलाकार मानधन निवडीसाठीची समिती अजून स्थापन झाली नसल्याकडे त्यांचे लक्ष वेधले. त्यावर ‘पदाधिकारी बदलानंतर समिती स्थापन करणार’ असे त्यांनी स्पष्ट केले.
पालकमंत्री पाटील आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना पदाधिकारी बदल करायचा आहे; परंतु तो फार तणातणी न व्हावा अशी त्यांची इच्छा आहे. शिवसेनेचे तीनही पदाधिकारी सहजासहजी राजीनामे द्यायला तयार नाहीत.
शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर आल्यानंतरही प्रवीण यादव आणि हंबीरराव पाटील हे दोन सभापती न भेटल्याने कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेना नेते संतप्त आहेत. दुधवडकर पुन्हा येणार होते; परंतु ते आले नाहीत.
सोमवारी दोन्ही मंत्री ‘गोकुळ’वरील कार्यक्रमासाठी हजर होते. यावेळी नूतन संचालक बनलेले माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांना शिक्षण सभापती प्रवीण यादव यांना राजीनामा देण्याविषयी सांगा, अशी सूचना केली. दिवसभरात खासदार सदाशिवराव मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर यांनीही पालकमंत्र्यांशी चर्चा केली.
चौकट
नेते सांगतील ते
शिवसेनेचे हंबीरराव पाटील, प्रवीण यादव आणि स्वाती सासने हे तीन पदाधिकारी सध्या चर्चेत आहेत. यातील सासने या राजीनाम्याबाबत सकारात्मक आहेत. डॉ. मिणचेकर यांच्या पातळीवर प्रवीण यादव यांचा विषय संपू शकतो. मात्र, माजी आमदार सत्यजित पाटील हंबीरराव पाटील यांच्या राजीनाम्यासाठी सहजासहजी तयार नाहीत. त्यांच्या मतदारसंघात जनसुराज्यची वाढती ताकद त्यांना डोकेदुखी ठरू शकते त्यामुळे याबाबत ते वरिष्ठांशी बोलणार असल्याचे सांगण्यात येते. सध्या तीनही सभापती आमच्या नेत्यांनी सांगितले की राजीनामा देणार एवढेच सांगत आहेत.