कोल्हापूर : सीमा भागातील मराठी बांधवांवर कर्नाटक सरकार करीत असलेल्या अन्यायाविरोधात शिवसेनेतर्फे शनिवारी छत्रपती शिवाजी चौकात कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली. यात बेळगाव-निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांनी केले. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स व कोल्हापूर जिल्हा हॉटेल मालक संघाने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत जिल्ह्यातील कन्नड व्यावसायिकांनी दिवसभर व्यवसाय बंद ठेवून आंदोलनास पाठिंबा दिला.या आंदोलनात मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी सहभाग घेत कर्नाटक सरकारच्या या अन्यायाविरोधात जोरदार निदर्शने केली. यावेळी माजी आमदार सुरेश साळोखे, सुजित चव्हाण, हर्षल सुर्वे, मंजित माने, चैतन्य अष्टेकर, अभिजित बुकशेट, राजू यादव, शांताराम पाटील, भगवान कदम, शिवाजी जाधव, शुभांगी पवार, स्मिता सावंत, नीता पडळकर, गीतांजली गायकवाड आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.