कोल्हापूर : आपत्ती व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या वतीने ‘शिव साहाय्यता केंद्र’ स्थापन करण्यात आले आहे. या केंद्राच्या कोनशिलेचे अनावरण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते येथे करण्यात आले. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते, तर प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के प्रमुख उपस्थित होते.पालकमंत्री पाटील म्हणाले, विद्यापीठाने शिव साहाय्यता केंद्राच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन व प्रशिक्षणाच्या संदर्भात प्रशिक्षित मनुष्यबळ निर्मितीचा महत्त्वाचा उपक्रम हाती घेतला आहे. महापुरासारख्या आपत्तीच्या क्षणी अशा प्रशिक्षित मनुष्यबळाचा शासन व प्रशासनाला निश्चितपणे सकारात्मक उपयोग होत असतो. त्या दृष्टीने या केंद्राला मोठे महत्त्व आहे.
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, कोल्हापूर, सांगली, सातारा या विभागांत यंदा अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व पूरपरिस्थितीमुळे झालेले नुकसान पाहता, भविष्यात योग्य ती खबरदारी घेण्यासाठी जागृती व आपत्ती व्यवस्थापन नियोजनाच्या मार्गदर्शनासाठी विद्यापीठाने शिव साहाय्यता केंद्रांतर्गत आपत्ती व्यवस्थापन व प्रशिक्षण केंद्र निर्माण करण्याचे ठरविले.
या केंद्राला, त्याच्या प्रारूप आराखड्याला आणि आनुषंगिक पदनिर्मितीसाठी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली आहे. केंद्राच्या कार्यवाहीसाठी २५ लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यास मान्यता दिली आहे.
या कार्यक्रमास कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही. टी. पाटील, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर. व्ही. गुरव, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. डी. के. गायकवाड, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक संजय परमणे, सिनेट सदस्य पंकज मेहता, उपस्थित होते.