कोल्हापूर : किल्ले रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यातील आकर्षण असणाऱ्या ‘बादल’ या अश्वाचा सोमवारी मृत्यू झाला. ताप मेंदूपर्यंत गेल्याने त्याचे निधन झाले. त्याच्यावर पांजरपोळ संस्थेच्या जागेमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.येथील पांजरपोळमधील संजय बागल यांच्या कुटुंबामध्ये ११ वर्षांपूर्वी बादल हा अश्व दाखल झाला. विविध स्पर्धा, उत्सव, सणांसाठी त्याला बागल यांनी तयार केले. गेल्या सात वर्षांपासून हा अश्व किल्ले रायगडावर जूनमध्ये होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात सहभागी होत होता. तो पायऱ्यांवरून चढून गडावर जात होता. राज्यभरातील शिवभक्तांचा तो लाडका होता.
विविध स्पर्धांमध्ये त्याने उल्लेखनीय कामगिरी केली. बादल हा कोल्हापूरची एक वेगळी ओळख बनला होता. त्याला गेल्या तीन दिवसांपूर्वी ताप आला. हा ताप त्याच्या मेंदूपर्यंत गेला. उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, माझी मुलगी प्राजक्ता हिच्या वाढदिवसानिमित्त नृसिंहवाडी येथून सन २००७ मध्ये ‘बादल’ची खरेदी केली. आमच्या कुुटुंबातील तो सदस्य बनला होता. गेल्या तीन दिवसांपूर्वी त्याला ताप आला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूमुळे आम्हाला मोठा धक्का बसला आहे. बादलची स्मृती कायम राहावी म्हणून नवीन अश्व आणणार असल्याचे संजय बागल यांनी सांगितले.