रमेश वारकेबोरवडे /कागल : साडे चार फुट घेरीची, साडे नऊ फुट लांबीची, अडीच टन वजनाची सहा पाऊंड गोळ्याचा मारा करणारी ऊखळी तोफ बोरवडेच्या त्रिवेणी रांगणा ग्रुपने सुमारे १७५ वर्षानंतर २००० फुट खोल दरीतून सहाव्या मोहिमेत बाहेर काढली. त्यावेळी बोरवडेच्या त्रिवेणी रांगणा ग्रुपच्या तरुणांच्या आनंदाला पारावर उरला नाही. आनंद व खुशीने डबडबलेल्या डोळ्यांना साक्षी ठेवत गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करत जय जिजाऊ, जय शिवाजी! आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा जयजयकार करत आनंद व्यक्त केला.
अनेक वर्षे जे काम कोणाला जमले नाही ते बोरवडे (ता.कागल) येथील त्रिवेणी ग्रुपने करुन दाखवले. याबद्दल त्यांंच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ही तोफ किल्ल्यावरील निंबाळकर वाड्याशेजारी ठेवली आहे. या मोहिमेसाठी सर्वोतोपरी सहकार्य करणारे महादेव फराकटे यांच्या हस्ते तोफेचे पूजन करण्यात आले. अखेर पावणे दोनशे वर्षाच्या खडतर वनवासानंतर ही तोफ रांगणा किल्ल्याच्या कुशित विसावली. घनदाट जंगल,वन्यप्राण्यांचा वावर, रस्त्यांचा अभाव, दरीत उतरण्यासाठी फक्त पायवाट, केवळ हाताने चेन ब्लॉक ओढण्याशिवाय अन्य पर्याय नाही अशा खडतर परिस्थितीतून जीव धोक्यात घालून मार्ग काढत ऐतिहासिक रांगणा किल्ल्याच्या पायथ्याशी सुमारे २००० फूट खोल दरीत पडलेली शिवकालीन तोफ गडावर आणण्यात यश मिळाले.भुदरगड तालुक्यातील रांगणा ऊर्फ प्रसिद्ध गडाच्या पायथ्याशी दाट जंगलात सुमारे २००० फूट खोल दरीत पडलेली ही तोफ अंदाजे अडीच टन वजनाची आहे. ही तोफ बोरवडे ( ता.कागल ) येथील त्रिवेणी ग्रुपच्या तरुणांनी अथक प्रयत्नाने दोरखंडाच्या सहाय्याने बाहेर काढण्यात यश मिळवले आहे. इसवी सन १८४४ च्या सुमारास गडकऱ्यांचे बंड दडपताना इंग्रजांनी गडावरील तोफा दरीत ढकलल्या होत्या. आता अनेक वर्षांनंतर या तोफा शोधण्याचे प्रयत्न होताना दिसत आहेत.या गडाच्या पायथ्याशी सुमारे २००० फुट खोल दरीत अशी एक तोफ असल्याची माहिती बोरवडे ( ता. कागल ) येथील त्रिवेणी ग्रुपच्या तरुणांना आणि त्रिवेणी ग्रुपचे प्रमुख बोरवडेतील उद्योजक महादेव फराकटे यांना समजली. त्यांनी ही तोफ दरीतून गडावर आणण्याचा निर्धार केला. त्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष गडावर भेट देऊन आवश्यक साहित्याची जमवाजमव केली.यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य आणि प्रोत्साहन महादेव फराकटे यांनी दिले.
चालू वर्षी १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीचे औचित्य साधून ग्रुपच्या सदस्यांनी गडाच्या पायथ्याशी दाट जंगलात सुमारे २००० फूट दरीत उतरुन ही तोफ बाहेर काढण्यास प्रारंभ केला.मोठमोठे दगडगोटे आणि झाडेझुडपे पार करत ते तोफेपर्यंत पोहचले. त्यानंतर गेली दोन महिने या तरुणांनी अथक परिश्रम करित अखेर ही तोफ १५ एप्रिल रोजी गडावर आणण्यात यश मिळविले आहे.तोफ वर काढत असताना क्षणोक्षणी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आणि जय शिवाजीच्या घोषात अगदी उत्साहात तोफ वर खेचण्याचे काम एकसारखे सुरु होते.दोन महिन्यांच्या परिश्रमानंतर गडावर तोफ आल्यावर शिवरायांचा जयघोष करित या तरुणांनी आनंद व्यक्त केला. या मोहिमेत १३ कायमस्वरुपी युवक आठवड्यातून तीन दिवस सहभागी झाले होते.
यामध्ये सुनील वारके, जीवन फराकटे, बाजीराव खापरे ( मडीलगे खुर्द ),प्रविण पाटील ( बिद्री ), शरद फराकटे , नेताजी साठे ,चंद्रकांत वारके ,राहुल मगदूम, मेजर सुनील फराकटे, निखिल परीट,अमर सातपुते, अरुण मगदूम, रघुनाथ वारके ( कासारवाडा ) , प्रज्योत चव्हाण, नेताजी सुर्यवंशी,अवधूत पाटिल ( खानापूर ), तानाजी साठे, भाऊ साठे, बजरंग मांडवकर ( वाळवे खुर्द ), अवधूत शिंगे, प्रथमेश पाटील या शिवप्रेमीनी सहभाग घेतला.
आम्ही कठीण परिस्थितीतही यशाला गवसणी घातली असून नैसर्गिक परिस्थितीचा विचार करता या तोफेचा शोध घेणे एक आव्हान होते. मात्र, घनदाट जंगल आणि शेकडो किलो वजनाची ही तोफ वर आणणे अशक्यप्राय गोष्ट. यामुळे त्याकडे दुर्लक्ष झाले होते.त्रिवेणी ग्रुपच्या सदस्यांनी महादेव फराकटे यांच्या सहकार्याने रांगणा किल्ल्याच्या पायथ्याशी दरीत उतरत तोफेचा शोध सुरु केला आणि दोन महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर तोफ गडावर आणण्यात या तरुणांना यश आले. दरीच्या मार्गावर पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने त्यांनी पाठीला पाण्याच्या बॉटल बांधून ते दरीत उतरले होते. या यशस्वी मोहिमेनंतर त्रिवेणी गुपच्या सदस्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते.- सुनिल वारके, प्रविण पाटील,सदस्य, रांगणा त्रिवेणी ग्रुप.