म्हाकवे : रयतेचे राजे असणारे शिवाजी महाराज हे शनिवार ६ जून १६७४ रोजी छत्रपती झाले. हा दिवस शिवराज्याभिषेक दिन म्हणून साजरा होतोय. ही अभिमानाची आणि सन्मानाची बाब आहे. याच दिवशी महाराजांनी परकीय चलनाचा भविष्यातील धोका ओळखून त्यांनी नाणी चलनात आणली. ही शिवकालीन नाणी आजही अस्तित्वात आहेत. त्यांचा सन्मान म्हणून राज्य शासनाने स्वाभिमानी ऐतिहासिक शिवराई चलन म्हणून मान्यता द्यावी, अशी मागणी पुरातन नाणी व शस्त्र संग्राहक अमरसिंह पाटील यांनी केली आहे. त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ व खासदार संभाजीराजे छत्रपती यांना मागणीचे निवेदन दिले. महाराजांकडे इंग्रजी अधिकारी हेन्री ऑक्झिंडेनही यांनी व्यापाराविषयी २० मागण्या केल्या. यापैकी १९ मान्य केल्या. मात्र, चलनाबाबतची मागणी शिवाजी महाराजांनी नाकारली. त्यांनी भविष्यातील धोका ओळखून हा निर्णय घेत सोने आणि तांबे धातूची नाणी चलनात आणली.
हेच महाराष्ट्राच्या स्वाभिमानी स्वराज्याचे चलन म्हणजेच होन व शिवराई होय. हे चलन आम्ही कित्येक वर्षांपासून हजारो शिवराई संग्रही व संवर्धन करून ठेवले आहेत. त्यावरील सांकेतिक चिन्ह व भाषा हे निसर्गावरील आस्तिक जपून ठेवण्याचे संदेश देत असल्याचेही पाटील यांनी सांगितले.