कोल्हापूर : जगदंबा तलवार भारतात परत आणावी, याकरीता कोल्हापुरातील शिवभक्त हर्षल सुर्वे यांच्यासह तिघेजण सोमवारी थेट पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर भगवा ध्वज फडकावत आंदोलन केले. याच मैदानांवर भारत व इंग्लंड या दोन संघांत सामना होणार आहे. इंग्लंडच्या राणीपर्यंत जगदंबा तलवारीचा विषय पोहोचावा, याकरीता हे आंदोलन करण्यात आले. याप्रकरणी सुर्वेसह तिघाजणांना तळेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, इंग्लंड संघाला कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात खेळू न देण्याचा इशारा देण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची इंग्लंडमध्ये असलेली तलवार भारतात परत आणावी. यासाठी शिवदुर्ग संवर्धन आंदोलनतर्फे गेले काही दिवसांपासून विविध पातळीवर पत्रव्यवहार व आंदोलन केले जात आहे. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर २३ मार्चला इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात सामना होणार आहे. हा सामना कोणत्याही परिस्थितीत इंग्लंडला खेळू द्यायचा नाही. त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी सकाळी हर्षल सुर्वे, चैतन्य अष्टेकर, देवेंद्र सावंत यांनी सातारा येथे खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेत निवेदन दिले. त्यानंतर त्यांनी थेट पुणे गाठत एमसीएच्या क्रिकेट मैदानावर धाव घेतली. तेथील मुख्य मैदानावर प्रवेश करत भगवा फडकाविला. त्यानंतर खेळपट्टी उकरण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथील सुरक्षा रक्षक व पोलिसांनी वेळीच धाव घेऊन त्यांचा हा प्रयत्न असफल केला. या कृतीबद्दल तळेगाव पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले.
फोटो : १५०३२०२१-कोल-सुर्वे
आेळी : जगदंबा तलवार भारतात परत आणावी या मागणीसाठी शिवदुर्ग संवर्धन आंदोलनतर्फे सोमवारी हर्षल सुर्वे यांच्यासह तिघाजणांनी पुण्यातील एम.सी.ए.च्या क्रिकेट मैदानावर भगवा फडकाविला.