कोल्हापूर : शहरातील विविध मंडळांनी परंपरेनुसार गुरुवारी साजरी होणारी शिवजयंती व छत्रपती संभाजी महाराज जयंती कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साजरी करण्याचा निर्णय विविध मंडळांनी घेतला आहे. यात संयुक्त जुना बुधवार पेठ, मंगळवार पेठेतील राजर्षी शाहू तरुण मंडळ व संयुक्त रविवार पेठ शिवजयंती उत्सव समिती यांचा समावेश आहे. यंदा सलग दोन दिवस पाठोपाठ परंपरेनुसार शिवजयंती व छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आहे. त्यामुळे संयुक्त जुना बुधवार पेठ शिवजयंती समितीतर्फे गुरुवारी सकाळी ९.३० वाजता संस्थेच्या सभागृहात जयंती उत्सव संयुक्तरीत्या साजरा केला जाणार आहे, तर मंगळवार पेठ, मिरजकर तिकटी येथील राजर्षी शाहू तरुण मंडळानेही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत सकाळी १० वाजून १० मिनिटांनी शिवप्रतिमा पूजन करण्याचा निर्णय घेतला आहे. असाच निर्णय संयुक्त रविवार पेठ शिवजयंती उत्सव समितीनेही घेतला आहे. ऐतिहासिक बिंदू चौकात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती प्रतिष्ठापना केली जाणार आहे. यावेळी कोरोनासंबंधी निर्बंध पाळून मोजक्या लोकांच्या उपस्थितीत जन्मसोहळा, पाळणा पूजन केले जाणार आहे. यानिमित्त स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांचा विमा उतरविला जाणार असून, त्यांना वाफेची यंत्रेही भेट दिली जाणार आहेत. सावित्रीबाई फुले हाॅस्पिटल, सीपीआर येथे सलग दोन दिवस खिचडी वाटप केली जाणार आहे. भागातील नागरिकांनी घरात थांबून शिवजयंती साजरी करावी. त्याची छायाचित्रे उत्सव समितीच्या व्हाॅट्सॲप ग्रुपवर पाठवावीत, असे आवाहन रविवार पेठ संयुक्त शिवजयंती समितीतर्फे करण्यात आले आहे.
शिवजयंती जयजयकारही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 4:24 AM