लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : पुराचे पाणी राष्ट्रीय महामार्गावर आल्यानंतर वाहतूक ठप्प होते, त्याचा मदत कार्यावर परिणाम होतो. यासाठी केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांच्या सहकाऱ्यातून शिरोली, शिरोळ व शिवाजी पूल येथे पाण्याचा व्यवस्थित निचरा होईल, असे प्लाय ओव्हर उभे करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. अतिवृष्टी व महापुराने झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे. नुकसानीबाबतचे चित्र स्पष्ट झाल्यानंतरच आर्थिक पॅकेजची घोषणा केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
महापुरामुळे झालेल्या नुकसानीची कोल्हापूर शहरात पाहणी केल्यानंतर शासकीय विश्रामगृहात लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांसमवेतील आढावा बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, कोल्हापुरातील अनेक तालुक्यात हंगामातील पाऊस तीन दिवसांत कोसळल्याने शेती, रस्ते, पूल, व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. दरडी कोसळून अनेकांना प्राण गमवावे लागले. अशा काळातही पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधींनी झोकून देऊन काम केले.
आता पाणी ओसरल्यानंतर साफ-सफाईसह इतर कामांना वेग आला आहे. पुराचे पाणी वाढण्याची अनेक कारणे आहेत, त्यातील प्रामुख्याने ठिकठिकाणी ब्रिटिशकालीन मोऱ्या आहेत. त्यांच्यामध्ये कमी व्यासाच्या पाइपमधून पाणी पुढे सरकत नसल्याने त्या तुंबतात. यासाठी बांधकाममंत्री अशोकराव चव्हाण व मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून पावसाळ्यानंतर येथे बॉक्स अथवा स्लॅबच्या मोठ्या मोऱ्या करण्याचा निर्णय घेतला जाईल. पुराच्या पाण्याने विद्युत खांब मोडल्याने वीज पुरवठा खंडित झाला तिथे प्राधान्याने पूर्ववत होत आहे.
शेतीचे मोठे नुकसान झाले आहे, जमिनी खरडून गेल्या आहेत. या सगळ्यांचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
यामुळे पुराचा धोका वाढला -
ब्रिटिशकालीन कमी व्यासाच्या पाइपच्या मोऱ्या
भराव टाकून उभारलेले पूल
शहरातील ओढ्या, नाल्यातील अतिक्रमणे
नद्यांत वाढलेला गाळ
धरणातून एकदम सुरू होणारा विसर्ग
जिल्हा नियोजनमधून बोटी घेणार
महापुरात लोकांच्या मदतीसाठी बोटींची गरज भासते. यासाठी जिल्हा नियोजनमधून तातडीने बोटी घेण्याची सूचना पालकमंत्र्यांना केल्याचे पवार यांनी सांगितले.
भराव टाकून पूल नको
मातीचा भराव टाकून अनेक ठिकाणी पूल बांधले आहेत. त्यातून पाणी सहजरीत्या पुढे सरकत नसल्याने तुंबी वाढते आणि लगेच रस्ते बंद होतात. यासाठी भराव टाकून पूल नको, अशी मागणी अनेक सरपंचांनी केल्याचे पवार यांनी सांगितले.
मृत शेतकऱ्याला मिळणार ९ लाख
अतिवृष्टी, पुराच्या पाण्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या व ज्याच्या नावावर सात/बारा असलेल्या शेतकऱ्यांना राज्याकडून ५ लाख, केंद्राकडून २ लाख व गोपीनाथ मुंडे अपघात विम्यातून २ लाख असे नऊ लाख रुपये मदत दिली जाणार आहे. तर इतरांना ७ लाख रुपये देणार असून मुंडे अपघात योजनेत काही त्रुटी आहेत, त्या तात्काळ दूर करणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
स्थलांतरांसाठी कारखान्यांवर मजूर वसाहती
प्रत्येक वर्षी पुराच्या पाण्याने हजारो कुटुंबांना स्थलांतरित व्हावे लागते. मात्र, त्यांची शेती तिथे असल्याने ते कायमस्वरूपी स्थलांतरित होऊ शकत नाहीत. यासाठी ‘दत्त’, ‘गुरुदत्त’, ‘जवाहर’, ‘शरद’ कारखान्यांना ऊसतोड मजुरांसाठी वसाहती उभ्या करण्यास सांगितले असून हंगाम संपल्यानंतर पावसाळ्यात स्थलांतरांसाठी वापर करता येईल, असे पवार यांनी सांगितले.
शहर स्वच्छतेसाठी मुंबई, पुण्यातून टँकर
पुरामुळे कोल्हापूर शहरात अनेक ठिकाणी गाळ साचला असून तो ओला आहे, तोपर्यंतच स्वच्छ करावा लागतो. यासाठी मुंबई, पुणे व नवी मुंबई महापालिकांच्या ४८ टीम कार्यरत झाल्याचे पवार यांनी सांगितले.
राज्यपालांबाबत नो कमेंट्स
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे भाजपचे आमदार आशिष शेलार यांच्यासमवेत कोकण दौऱ्यावर गेल्याचे निदर्शनास आणून दिले असता, महामहीम राज्यपालांनी कोणासोबत जायचे, हा त्यांचा अधिकार आहे. याबाबत आपली ‘नो कमेंट्स’ असे पवार यांनी सांगितले.
दृष्टिक्षेपात बाधित गावे-
बाधित गावे - ३९६
बाधित कुटुंबे - ४४ हजार ७०६
सदस्य - १ लाख ९४ हजार ४६४
निवारा केंद्रे - २५३ पैकी शासकीय -२२२
मृत व्यक्ती - ७
पाणी योजना बंद -८८९
वीज कनेक्शन बंद ग्राहक - २ लाख ४० हजार