कोल्हापूर : शिवाजी पुलाचा प्रश्न हा आंदोलक आणि पत्रकार यांच्या पाठपुराव्यामुळे मार्गी लागल्याची स्पष्ट कबुली पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.प्रेस क्लबच्या डायरीचे प्रकाशन शुक्रवारी मंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. महापौर शोभा बोंद्रे, आमदार राजेश क्षीरसागर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, उपमहापौर महेश सावंत यावेळी उपस्थित होते.पालकमंत्री पाटील म्हणाले, समाजाला दिशा देण्यासाठी पत्रकार हा अभ्यासू हवा असे सांगून ग्रंथालयासाठी उत्तम पुस्तके घ्यावीत. मुंबई, दिल्ली येथील पत्रकारितेचा अभ्यास करण्यासाठी दरवर्षी एका पत्रकाराला फेलोशीप देण्याचीही घोषणा यावेळी पाटील यांनी केली.पत्रकारांच्या अडचणींचा उहापोह करताना पाटील म्हणाले, आपण एक ५00 घरांची नवी योजना तयार करत असून यामध्ये पत्रकारांना किफायतशीर किंमतीमध्ये घर उपलब्ध करू दिले जाईल. अटल पेन्शनच्या माध्यमातून सेवानिवृत्तीवेतन देण्यासाठी प्रयत्न करू.आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले,निधीअभावी कुणावरही उपचार झाले नाहीत अशी परिस्थिती आता राहिली नाही. कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी दिला नाही इतका निधी देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. त्यामुळे शिवसेना भाजप सरकारचा मला अभिमान आहे. आम्हांला घडवण्यामध्ये पत्रकारांचा मोलाचा वाटा आहे.उपचारासाठी मदत केल्याबद्दल पालकमंत्री पाटील यांनी मदत केल्याबद्दल छायाचित्रकार संदीप मोरे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. तसेच हे दालन उभारणीसाठी सहकार्य करणारे क्रीडाईचे अध्यक्ष महेश यादव, संदीप मिरजकर, निखिल अगरवाल, सचिन अगरवाल, अजित खोत यांचा सत्कार करण्यात आला.प्रेस क्लबचे अध्यक्ष लुमाकांत नलवडे यांनी प्रास्ताविक केले तर उपाध्यक्ष तानाजी पोवार यांनी आभार मानले. शुभांगी तावरे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी डॉ. सुनील पाटील, वसंतराव मुळीक, ‘आस्मा’चे अध्यक्ष राजीव परूळेकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.