संतोष मिठारी कोल्हापूर : राजाराम महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. बाळकृष्ण लिखित ‘शिवाजी द ग्रेट’ या शिवचरित्राचा पुनर्जन्म कोल्हापुरात गेल्या दोन वर्षांपूर्वी झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांचा खरा इतिहास मांडणाºया आणि पुनर्संपादन झालेल्या पाच खंडांचा हा ग्रंथ आतापर्यंत देशभरातील तीनशे विद्यापीठांत पोहोचला आहे.या पुनर्संपादनातून नव्याने १८०० पानांचा पाच खंडांचा ‘शिवाजी द ग्रेट’ हा ग्रंथ तयार झाला. या ग्रंथाचे संपादन सह्याद्री इतिहास संशोधन केंद्राचे अध्यक्ष व इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी केले. योग्य संदर्भसाधनांच्या आणि इंग्रजी भाषेतील प्रभावी शिवचरित्राअभावी देश-विदेशांतील विद्वानांनी लिहिलेल्या इतिहासामध्ये शिवचरित्राची योग्य मांडणी झालेली नाही. त्यामुळे आजही इतिहास संशोधकांना शिवचरित्राची उणीव भासते. ती भरून काढत डॉ. बाळकृष्ण लिखित हे शिवचरित्र देश-विदेशांतील विद्यापीठांमधील विद्यार्थी, अभ्यासक संशोधकांना उपलब्ध व्हावे यासाठी सह्याद्री इतिहास संशोधन केंद्रातर्फे जगभरातील विद्यापीठांना भेट म्हणून मोफत पाठविण्यात येत आहे. त्याची सुरुवात १३ आॅगस्ट २०१७ रोजी करण्यात आली. यानंतर आतापर्यंत भारतातील तीनशे विद्यापीठे, शैक्षणिक संस्थांमध्ये हा ग्रंथ पोहोचला आहे. यामध्ये अलीगढ मुस्लिम विद्यापीठ, जेएनयु, बनारस हिंदू विश्वविद्यालय, बनस्थली विद्यापीठासह आसाम, कोलकाता, बिहार, आदी राज्यांतील विद्यापीठे, आयआयटी, आयआयएम या शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे. या विद्यापीठांना दिलेल्या ग्रंथांत संपादकीय खंड, ‘शहाजी,’ ‘शिवाजी द ग्रेट’ भाग एक व दोन, ‘शिवाजी द मॅन अॅँड हिज वर्क’ या खंडांचा समावेश आहे. देशभरातील इतिहास संशोधक, अभ्यासकांना हा ग्रंथ उपयुक्त ठरणार आहे.सह्याद्री इतिहास संशोधन केंद्राकडून पुनर्संपादनमुल्तान, पंजाबसारख्या प्रदेशांतून आलेले व लंडन विद्यापीठातून पीएच. डी. केलेले डॉ. बाळकृष्ण हे राजाराम महाविद्यालयाचे प्राचार्य होते. त्यांनी सन १९३२ ते १९४० च्या दरम्यान शककर्ते शिवरायांचे चरित्र ‘शिवाजी द ग्रेट’ या नावाने चार खंडांत प्रसिद्ध केले होते; पण, दुर्दैवाने काळाच्या ओघात हे महान शिवचरित्र विस्मरणात गेले होते. ते पुन्हा एकदा लोकांसमोर आणण्याचे काम गतवर्षी या खंडांच्या पुनर्संपादनाद्वारे केले असल्याचे सह्याद्री इतिहास संशोधन केंद्राचे अध्यक्ष इंद्रजित सावंत यांनी सांगितले.
तीनशे विद्यापीठांमध्ये पोहोचले ‘शिवाजी द ग्रेट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 1:16 AM